नागपूर : मद्याच्या किमतीत शासनाने वाढ केली. त्याचा खिश्यावर परिणाम झाला. पिणाऱ्यांच्या संख्येत घट दिसत नाही. पिणाऱ्यांनी फक्त त्याचा प्रकार बदल्याचे दिसते. उपराजधानीतील पिणाऱ्यांनी वर्षभारात ६.१६ कोटी लिटर मद्याचा घोट घेतला. शासनाने लाडकी बहीण योजना आणली. त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला. परंतु त्याचा भार पिणाऱ्यांवर टाकला. शासनाने मद्यावरील कर वाढवला. त्यामुळे मद्याचे दर वाढले. त्याचा परिणाम काही काळ दिसून आला. मद्यावरील कर वाढविल्याने विदेशी मद्याच्या विक्रीत घट झाली . परंतु त्याचा महसुलावर परिणाम झाल्याचे दिसत नाही. पिणाऱ्यांनी विदेशी मद्य सोडून देशी , बिअर आणि वाईनला पसंती दिली आहे. त्यामुळे विदेशीच्या तुलनेत बिअर आणि वाईनच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत वर्ष २०२५-२६ मध्ये जवळपास ४० कोटींचा महसूल जादा मिळाला आहे. वर्ष २०२५-२६ मध्ये नागपूरकरांनी ६,१५,९८,१५८ लिटर मद्य रिचवले. यात सर्वाधिक २ कोटी ८४ लाख ६० हजार, २८१ लिटर देशी, १ कोटी ६३ लाख ५८ हजार ५६३ लिटर विदेशी, १ कोटी ६२ लाख ६४ हजार २६४ लिटर बिअर तर ५ लाख १५ हजार ५० लिटर वाईन आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे शासनावर आर्थिक भार आला. त्यामुळे शासनाने मद्यावरील करात वाढ केली. त्याचा थेट परिणाम मद्यावर झाला. मद्यापासून थोडा आखडता हात घेतला. विदेश मद्याच्या विक्रीत घट झाली. देशीवरही त्याचा परिणाम झाला. परंतु हा परिणाम फार काळ राहिला नाही. उत्पादन शुल्काच्या आकड्यांनुसार जुलै व डिसेंबर महिन्यात देशीच्या विक्रीत घट झाली. इतर महिन्यात त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
तर विदेश मद्याच्या विक्रीत ऑगस्टनंतर सतत घट आहे. पिणाऱ्यांनी बिअरला पसंती दिली. त्याच प्रमाणे वाईनला प्राधान्य दिले. त्यामुळे बिअर आणि वाईनच्या विक्रीत वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत वर्ष २०२५-२६ मध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे.
