नागपूर : आयटी पार्क ते माटे चौक मार्गावर खाद्यापदार्थ विक्री करणाऱ्यांना महापालिकेकडूनच अतिक्रमणाचा ‘छुपा’ परवाना देण्यात आला आहे, असा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला. असे नसते तर मागच्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतूक पोलिसांच्या कारवाईनंतर हा मार्ग नक्कीच मोकळा झाला असता. पोलीस केवळ वरवरची कारवाई करीत आहेत. त्यांना अतिक्रमण करून थाटलेली खाद्यापदार्थाची दुकाने उचलण्याचा अधिकार नाही, याकडेही या नागरिकांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परिसरातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत ‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित करताच सोनेगाव वाहतूक विभाग झोपेतून खळबळून जागा झाला व त्यांनी वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कारवाई सुरू केली. मात्र, अतिक्रमण हटवण्याचा अधिकार ज्या महापालिकेकडे आहे त्या महापालिकेतील संबंधित अधिकारी झोपेचे सोंग घेऊन बसले आहेत.

हेही वाचा – शेतकरी सन्मान कर्जमुक्तीपासून वंचित शेतकऱ्यांबाबत १५ दिवसांत निर्णय घ्या, नागपूर उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मद्य पिण्यास मुभा!

या खाद्यापदार्थाच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी येतात. मध्यरात्रीच्या सुमारास काही हातठेल्यावर तरुण-तरुणींना दारू, बिअर पिण्याची मुभा देण्यात येते. त्यामुळे येथील काही दुकाने तर मिनी बार झाल्याचे चित्र आहे. दारूसाठी थंड पाणी विक्रेतेच पुरवतात. या सर्व प्रकाराकडे पोलीसही झोळेझाक करतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख हरीश राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

महापालिकेला किती लाखांचा ‘हप्ता’?

या मार्गावरील व्यावसायिक उलाढाल कोट्यवधींची आहे. यातून लाखोंचा ‘हप्ता’ महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला मिळतो. म्हणून ते पथक येथे कारवाई करण्याचे धाडस करीत नाही, असा आरोप या अतिक्रमणामुळे जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या या परिसरातील नागरिकांनी केला. सोबतच महापालिका आयुक्तांचे या पथकाच्या कारभारावर लक्ष नाही का, ते स्वत: पुढाकार घेऊन पथकाला कारवाईचे निर्देश का देत नाहीत, असा सवालही नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा – करकरेंच्या मृत्यूवरील वक्तव्य वडेट्टीवारांना भोवणार?……भाजपकडून पोलिसात तक्रार….

आयटी पार्क ते माटे चौक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर नियमित कारवाई करण्यात येत आहे. पोलीस आणि महापालिकेच्या संयुक्त कारवाईसाठी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. – विनोद चौधरी, वाहतूक विभाग प्रमुख, सोनेगाव.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur allegation of giving hidden encroachment license to food vendors by municipal corporation adk 83 ssb
First published on: 07-05-2024 at 10:45 IST