नागपूर : अमृत या शब्दाभोवती वलय आहे. भारतीय पुराणकथांनुसार ते एक दिव्य पेय आहे. अनेक असाध्य रोगावरील औषध्यांच्या नावातही अमृत शब्द वापरला जातो. मात्र नागपूरकर हा शब्द ऐकताच नाक मुरडताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याचे कारणही तसेच आहे.

काय त्रस्त झाले नागरिक?

शहरात सांडपाणी वाहिनी टाकण्यात येत आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, रस्त्याचे पुनर्भरण योग्यरित्या केले जात नसल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे रस्त्याच्या मध्यभागी सांडपाणी वाहिनीला घरांतील सांडपाणी पाईप जोडण्यासाठी पुन्हा रस्ता खोदण्याची शक्यता असल्याने नगरसेवक, नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे ही कामे केंद्र शासनाच्या अमृत-२.० योजनेंतर्गत महापालिकेद्वारे केली जात आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी २५ टक्के अनुदान देणार असून ५० टक्के वाटा महापालिका देणार आहे.

शहराच्या सर्वच भागात रस्त्यावर घसरपट्टी

योजनेच्या अंमलबजावणीसाठी दक्षिण नागपुरातील बीडीपेठ, हुडकेश्वर, ओमनगरात मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी खोदकाम करण्यात आले आहे. सांडपाणी वाहिनी टाकल्यानंतर काही ठिकाणी खोदकाम बुजवण्यात आले. परंतु खड्ड्याचे योग्य पुनर्भरण न केल्याने पाऊस आल्यानंतर वाहने घसरून पडत आहेत. हीच स्थिती पश्चिम नागपुरातील प्रभाग १४ मध्ये सिव्हिल लाईन, सीपी क्लब, रविनगर शासकीय वसाहतीत केलेल्या खोदकामाची आहे. येथेही रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम केल्यानंतर कंत्राटदार कंपनी अभी इंजिनिअरिंगकडून योग्य पुनर्भरण करण्यात आले नसल्याने अपघाताची शक्यता नगरसेवक अभिजित झा यांनी व्यक्त केली. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगूनही पुनर्भरण योग्य होत नसल्याबाबत संताप व्यक्त केला. शहरातील चिंचभुवन, गिट्टीखदान, झिंगाबाई टाकळी परिसरातही हीच स्थिती आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून ये-जा करताना दुचाकीधारकांवर अपघाताची टांगती तलवार आहे.

पावसाळ्यात अधिक वाढला धोका

रस्त्यावरून पावसाळ्यात वाहने घसरून पडण्याची शक्यता असून एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, आता रस्त्याच्या मध्यभागी सांडपाणी करण्यात आल्याने घरांतील सांडपाण्यासाठी पुन्हा पाईप जोडण्यात येईल. त्यामुळे पुन्हा खोदकाम करण्यात येणार आहे. एकच रस्ता कितीदा खोदणार, आताच घरातील सांडपाण्यासाठी पाईप का जोडण्यात आले नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

सदोष पुनर्भरणाने वाट बिकट

कंत्राटदारांनी खोदकामानंतर रस्त्यांचे पुनर्भरण करून ते पूर्ववत करणे अपेक्षित आहे. परंतु योग्यरित्या पुनर्भरण करण्याऐवजी प्रभाग १० मध्ये चालढकल पद्धतीने काम करण्यात आल्याने या भागातून येजा करणाऱ्या हजारो नागरिकांची वाट बिकट झाल्याचे नगरसेवक झा यांनी सांगितले. दक्षिण नागपुरातील ओंकारनगर चौक ते बेसा टी-पॉईंटपर्यंतच्या रस्त्याचेही मागील वर्षी खोदकाम करण्यात आले होते. त्यानंतर कंत्राटदार कंपनीने पुनर्भरण केले. परंतु ते व्यवस्थित न केल्याने आजही या रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन दुचाकी चालवावी लागत आहे.

पुनर्भरण रस्त्याला समतल नाहीच

गांधीनगर चौक ते व्हीएनआयटी चौक किंवा ओंकारनगर रस्त्याचे पुनर्भरण करण्यात आले. परंतु ते रस्त्याला समतल नाहीच. अनेकदा रात्रीच्या अंधारात समतल रस्ता दिसत नसल्याने अपघात वाढत आहे. रात्रीला वाहनचालकांना रस्त्याचे असमान भाग ओळखणे आव्हानात्मक असल्याचे गांधीनगर रस्त्यावरील काही दुकानदारांनी नमुद केले.

बीडीपेठ, हुडकेश्वर, ओमनगर भागात रस्त्याच्या मध्यभागी सांडपाणी वाहिनीसाठी खोदकाम केले. घरातून सांडपाण्याची पाईप जोडण्यासाठी भविष्यात पुन्हा खोदकाम करून रस्त्याची दुरवस्था करण्यात येईल. दुसऱ्यांदा नागरिकांची पैशाची उधळण केली जाईल, ते वेगळेच. संजय महाकाळकर, विरोधी पक्षनेते, महापालिका.