नागपूर : जखमी, गंभीर आजारी किंवा अपघातग्रस्त प्राण्यांना उपचारासाठी तातडीने अतिदक्षता सुविधा मिळणे अनेकदा आव्हानात्मक ठरते. विशेषतः गंभीर अवस्थेतील प्राण्यांना व्हेंटिलेटर, सतत निरीक्षण, ऑक्सिजन तसेच औषधांचा नियंत्रित पुरवठा यांसारख्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक असते. विदर्भात प्राण्यांसाठी स्वतंत्र ‘क्रिटिकल केअर’ सुविधा उपलब्ध नसल्याची उणीव भरून काढण्याच्या दिशेने नागपुरात ‘राईज फॉर टेल्स’ या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे.
गंभीर अवस्थेतील प्राण्यांसाठी स्वतंत्र अतिदक्षता कक्ष
अपघात, गंभीर दुखापत, श्वसनविकार किंवा अन्य कारणांमुळे प्राण्यांची प्रकृती अचानक खालावल्यास त्यांना तातडीच्या उपचारांची आवश्यकता असते. अशा वेळी केवळ नियमित पशुवैद्यकीय उपचार पुरेसे ठरत नाहीत. सतत निरीक्षण, ऑक्सिजनचा पुरवठा आणि आवश्यकतेनुसार श्वसनास मदत करणारी यंत्रणा उपलब्ध असणे महत्त्वाचे ठरते. नव्या सीसीयूमध्ये भूल देताना आवश्यक व्हेंटिलेटर, पशुवैद्यकीय मल्टिपॅरा मॉनिटर, ईसीजी, नवजात पिल्लांसाठी इनक्युबेटर, ‘कंटिन्युअस रेट इन्फ्युजन’ (सीआरआय) पंप आणि व्हेटरिनरी नेब्युलायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मध्यवर्ती ऑक्सिजन व्यवस्थेशी जोडलेले तीन बेडही या युनिटमध्ये आहेत. त्यामुळे गंभीर अवस्थेतील प्राण्यांचे सतत निरीक्षण करताना आवश्यकतेनुसार ऑक्सिजन आणि इतर अतिदक्षता उपचार देणे शक्य होणार आहे.
दुखापतीनंतर पुनर्वसनासाठी फिजिओथेरपी
प्राण्यांच्या उपचारांमध्ये केवळ शस्त्रक्रिया किंवा औषधोपचार पुरेसे नसतात. विशेषतः अपघात किंवा गंभीर दुखापतीनंतर स्नायूंची हालचाल, सांध्यांची कार्यक्षमता आणि एकूण शारीरिक क्षमता पूर्ववत करण्यासाठी पुनर्वसनाची आवश्यकता असते. ही गरज लक्षात घेऊन संस्थेने स्वतंत्र फिजिओथेरपी केंद्रही सुरू केले आहे.
‘लोटस ब्युटी केअर’च्या राजी कुमारी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. येथे टीईएनएस, एनएमईएस, आयएफटी, थेरप्युटिक अल्ट्रासाऊंड, लो-लेव्हल लेझर थेरपी, टीईसीएआर थेरपी आणि इन्फ्रारेड थेरपी यांसारख्या उपचारपद्धतींची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अपघातग्रस्त किंवा दुखापत झालेल्या प्राण्यांना उपचारानंतर पुन्हा चालणे, हालचाल करणे आणि दैनंदिन शारीरिक क्रिया करण्यास सक्षम करण्यासाठी फिजिओथेरपीचा उपयोग होणार आहे. त्यामुळे गंभीर अवस्थेतील उपचारांपासून पुनर्वसनापर्यंतची सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
‘सहजीवन’ची ब्रेल आवृत्ती
प्राण्यांच्या उपचारांसोबतच जनजागृतीवरही संस्थेने भर दिला आहे. कार्यक्रमात ‘सहजीवन’ या शालेय जनजागृती उपक्रमाची ब्रेल आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. देवांग कुसुमगर यांच्या हस्ते या आवृत्तीचे प्रकाशन झाले.
जबाबदार प्राणीपालन, रेबीजबाबत जनजागृती आणि मानव-प्राणी सहअस्तित्व याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा ‘सहजीवन’ उपक्रमाचा उद्देश आहे. ब्रेल आवृत्तीच्या माध्यमातून हा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
प्राण्यांसाठी अत्याधुनिक उपचार, अपघात किंवा आजारानंतर पुनर्वसन आणि समाजात प्राण्यांबाबत संवेदनशीलता निर्माण करणे, या तिन्ही पातळ्यांवर काम करण्याचा प्रयत्न ‘राईज फॉर टेल्स’कडून करण्यात येत आहे.
“विदर्भातील पहिले ‘क्रिटिकल केअर युनिट’
प्राण्यांसाठी सुरू केले आहे. प्रगत उपचार देण्यासाठी हे युनिट व्हेंटिलेटर आणि आपत्कालीन ऑक्सिजन पुरवठ्याने सुसज्ज आहे. यासोबतच नवीन फिजिओथेरपी युनिट आणि ब्रेल लिपीतील ‘सहजीवन’ सुरू करून प्राणीसेवा अधिक सर्वसमावेशक आणि सुलभ करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे, असे ‘राईज फॉर टेल्स’च्या संस्थापक गार्गी वैरागडे म्हणाल्या.
