पारडी हत्याकांडात आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला तामिळनाडूतून ताब्यात घेण्यात आले असून गणेशराम राजेश कुर्रे असे आरोपीचे नाव आहे. या हत्याकांडात मायलेकींच्या प्रियकरासह पाच जणांचा समावेश आहे.

आरोपी अखिलेश मुंडे आणि निशा गजभीये यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. दोघांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण पती धर्मेंद्र गजभीये याला लागली होती. त्यामुळे त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा प्रियकर अखिलेशला घरी येण्यास मनाई केली होती. दोघांनाही विरह सहन न झाल्यामुळे प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्याचा कट निशा आणि अखिलेशने रचला.

त्यासाठी तिने मोठी मुलगी हिला विश्वासात घेतले. मुलीच्या प्रियकराला घरी बोलावून त्याला हत्याकांडात सहभागी करून घेतले. ११ एप्रिल २०२२ ला अखिलेश मुंडे, मनोज उर्फ गोलू ओमप्रकाश बावने, गणेशराम कुर्रे आणि बंटी हे निशाच्या घरी आले. तिचा पती धर्मेद्रचा त्यांनी गळा आवळून खून केला. त्याला पंख्याला लटकवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला. या प्रकरणी पारडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

पारडीचे ठाणेदार मनोहर कोटनाके यांना घटनास्थळावरील स्थिती बघता संशय आला. त्यामुळे त्यांनी निशा व तिच्या मुलीला चौकशीसाठी बोलावले. दोघीही वेगवेगळी उत्तरे देत असल्याने संशय बळावला. घरातीस ‘सीसीटीव्ही फुटेज’चा ‘डिव्हीआर’ मुलीच्या प्रियकराने फोडला तर आईच्या प्रियकराने पुरावे नष्ट केले. हत्याकांड असल्याचे उघडकीस येताच आई व तिचा प्रियकर, मुलगी व तिचा प्रियकराला अटक करण्यात आली. तर शेवटचा आरोपी गणेशराम हा तामिळनाडूला पळून गेला होता, त्यालाही पोलिसांनी अटक केली.