नागपूर : हनुमान जयंती शोभायात्रेतून अपहरण झाल्यानंतर अथर्व नानोरे या अवघ्या १४ वर्षांच्या शाळकरी मुलाचा खून झाल्याच्या घटनेने शहर हादरले होते. या हत्याकांडाचा अखेर सोमवारी गुन्हे शाखेने उलगडा केला. गिट्टीखदान पोलीस आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत तीनही मारेकऱ्यांना अटक केली असून सर्व आरोपींचे वय २० ते २२ वर्षांच्या दरम्यान आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपी हा अथर्वचाच शेजारी असल्याचे समोर आले आहे.

जयराम गोपाल यादव (१९, रा. आयबीएमरोड, गिट्टीखदान), केतन उर्फ ​​कुणाल रमेश साहू (२२, रा. कुतुबशाह मशिदीजवळ, गिट्टीखदान) आणि आयुष मोहन साहू (१९, रा. शिवशंकर मंदिरासमोर, मानकापूर) अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. हे तिन्ही आरोपी भाजीपाला विक्रीचे गाडे चालवत होते. ते पीडित मुलाच्या कुटुंबाच्या ओळखीचे होते.

आरोपी अथर्वच्या वडिलांकडून हे तिघेही अनेकदा भाजीपाला खरेदी करत होते. त्यांचे काही पैसेही दिलीप यांना देणे होते. अथर्वचे वडील हे भाजीपाल्याचे घाऊक विक्रेते आहेत आणि त्यांच्याकडे मोठी रोख रक्कम असते, याचीही आरोपींना कल्पना होती. याच लोभापोटी, घटनेच्या तीन दिवस आधी अथर्वचे अपहरण करण्याचा कट रचला होता. त्यासाठी आईसक्रीमचे आमिष दाखवून अथर्वला गर्दीतून आणण्याची जबाबदारी जयरामवर सोपवण्यात आली होती.

आईस्क्रीमच्या बहाण्याने बाहेर नेले

घटनेच्या दिवशी हनुमान जयंतीची शोभायात्रा सुरू असताना कटानुसार जयरामने अथर्वला आईस्क्रीमच्या बहाण्याने बाहेर नेले. जयरामने त्याला ‘टाटा एस’ गाडीजवळ नेले. जिथे आयुष आणि कुणाल आधीच वाट पाहत होते. त्या तिघांनी अथर्वला बळजबरीने गाडीत कोंबले आणि अथर्वने आरडाओरडा करू नये म्हणून त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला.

atharva nanore murder case (photo- loksatta)
अथर्व नानोरे हत्या प्रकरणातील आरोपी

आरोपींनी गाडी गोरेवाड्याच्या दिशेने नेली. मात्र, गिट्टीखदान परिसरात सुरू असलेल्या गोंधळ आणि कोलाहलामुळे घाबरून त्यांनी कापडाच्या साहाय्याने अथर्वचा गळा आवळून खून केला. त्यानंतर, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत त्यांनी ती गाडी रस्त्याच्या कडेला सोडून दिली आणि ते आपापल्या घरी निघून गेले.

दरम्यान, अथर्वचा मृतदेह कळमेश्वर हद्दीत भरतवाडा परिसरात रिंगरोडलगत एका पोत्यात हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर शहरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले होते.हत्याकांडानंतर आरोपी आपण काहीही केले नाही, अशा अविर्भावात अवती भवती फिरत होते.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला दिशा

तपासादरम्यान अथर्व शेवटचा दोन मित्रांसोबत आईस्क्रीम पार्लरजवळ दिसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोपींनी त्याला सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या ठिकाणी नेले. त्यामुळे हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी सापडलेल्या पोत्यावरील ट्रेडमार्क हा तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरला. त्याच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. प्राथमिक चौकशीत वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पुढील तपासात या भीषण हत्येमागील नेमके कारण उघड होण्याची शक्यता आहे.

नेमके प्रकरण काय?

हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गुरुवारी गिट्टीखदान परिसरात शोभायात्रा निघाली होती. अथर्व नानोरे हा तिथून बेपत्ता झाला. शोभायात्रा संपली तरी अथर्व घरी परतला नाही, तेव्हा कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, त्यांना कोणताही मागमूस लागला नाही. कुटुंबीयांनी गिट्टीखदान पोलिसांकडे अथर्व बेपत्ता असल्याची तक्रार केली. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास, कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतवाडा परिसरात, कोराडी-फेटरी बाह्यवळण रस्त्यावर एका बोअरवेलमध्ये अथर्वचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळला. अथर्वची हत्या केल्यानंतर, मारेकऱ्यांनी त्याचे हात-पाय बांधले. त्याचा मृतदेह बोअरवेलमध्ये कोंबला आणि रस्त्याच्या कडेला सोडून दिला. मृतदेह सापडल्याच्या बातमीने संपूर्ण शहर आणि पोलीस दलात खळबळ उडाली. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयोत पाठवला. दरम्यान, मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच, त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यांनी हंबरडा फोडला. या क्रूर हत्येमुळे परिसरातील रहिवाशांमध्येही संतापाचे आणि शोकाचे वातावरण होते.