नागपूर : पुणे येथील हडपसर परिसरातल्या उषाकिरण रुग्णालयात बॉम्ब ठेवल्या प्रकरणात नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने एकाला रेल्वे स्थानकावरून अटक केली.

शिवाजी राठोड असे दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. पुण्यात बॉम्ब ठेवल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर राठोड हा हावडा एक्सप्रेसने कोलकाता येथे पळून जात होता, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावर तीन रेल्वे गाड्यांची तपासणी केली. यात शालिमार एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना राठोड दहशतवाद विरोधी पथकाच्या हाती लागला. राठोड हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

पुणे येथील हडपसर भागातील उषाकिरण नावाच्या रुग्णालयात कमी दर्जाची बॉम्ब सदृष्य वस्तू ठेवल्यानंतर राठोडने पुणे- कोलकाता दरम्यान धावणारी शालीमार एक्स्प्रेस रेल्वे पकडली होती. दरम्यान पुणे पोलिसांनी माहिती दिल्यानंतर नागपूर येथील दहशतवाद विरोधी पथकाने पश्चिमबंगालच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची कसून तपासणी केली.