नागपूर : देशाचा केंद्रबिंदू असलेल्या नागपुरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी रात्री मोठी कारवाई केली. पाकिस्तानातील संघटित गुन्हेगारी टोळीशी इंटरनेटवरील समाजमाध्यमांवरून संपर्क साधल्या प्रकरणात एटीएसने १० जणांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात एकट्या नागपुरातील चार, चंद्रपूर जिल्ह्यातील ३ आणि गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. एटीएसच्या या कारवाईमुळे संपूर्ण विदर्भात खळबळ उडाली असून मध्य भारतातील संघटित गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आल आहे.
नेमका कोणाशी साधला संपर्क?
भारतात संघटितपणे गुन्हेगारी करणारी लॉरेन्स बिष्णोईची टोळी कुप्रसिद्ध आहे. त्या प्रमाणे पाकिस्तानमध्ये शहजाद भाटी, राणा उनेन यांची टोळी कुप्रसिद्ध आहे. पाकिस्तानातील सिंध, कराची,लाहोर भागात ही टोळी सक्रिय आहे. नागपूर विभागातून संपर्क साधलेल्या या दहा जणांनी शहजाद भट्टीच्या समाजमाध्यमांवर संदेश पाठवल्याचे आढळले होते. त्यातला संवाद एटीएस तपासून पहात आहे.
कसा झाला संपर्क?
एटीएसमधील अधिकृत सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना या कारवाईला दुजोरा दिला. शहजाद भट्टीची टोळी इंटरनेटवरील इन्स्टाग्राम सारख्या समाजमाध्यमांवरून संशयितांचा शोध घेते. त्यांना स्वतः संदेश पाठवते. त्यानंतर विश्वास बसताच त्यांना छोटे छोटे टास्क दिले जातात. या बदल्यात काही रक्कम ही टोळी ऑनलाईन माध्यमातून देते.
एटीएसकडून बारकाईने तपास
शहजाद भट्टी आणि राणा उनेनशी संपर्क साधणाऱ्यांनी नेमकी कोणती बेकायदेशीर कामे केली, यात काही दहशतवादी कृत्यांचा समावेश होता का, यात नेमका किती रकमेचा व्यवहार झाला, याचा दहशतवाद विरोधी पथकाकडून तपास केला जात आहे. नागपुर विभागातील नागपूर शहरातील ४, चंद्रपूर जिल्ह्यातील ३ आणि गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातल्या नेमक्या कोणत्या भागातून यांना ताब्यात घेण्यात आले, या बाबत मात्र एटीएसने अधिकृत माहिती देण्यास अमर्थता दर्शवली. एटीएसच्या या कारवाईमुळे संपूर्ण विदर्भात खळबळ उडाली असून मध्य भारतातील संघटित गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आल आहे.
