नागपूर :इंदोरा बुद्ध विहार अंतर्गत सुरू असलेले ‘नालंदा मुलींचे वस्तीगृह’ अवैधरित्या चालवले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बाल संरक्षण पथकाने तकाळ कारवाई करत येथून २९ अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे.

पथकाने केलेल्य तपासणीत वसतिगृहात आवश्यक कागदपत्रे, अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र, तसेच नियमानुसार अधीक्षक, सुरक्षा रक्षक आदींची नियुक्ती नसल्याचे आढळले. बालगृहात स्वच्छता आणि मुलींच्या सुरक्षेचा अभावही दिसून आला. विशेष म्हणजे कोणतीही अधिकृत नोंदणी नसताना इतर राज्यांतील तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील. व दोन अनाथ मुलींना येथे दाखल करण्यात आले होते. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने तात्काळ नागपूर बाल कल्याण समिती यांना माहिती देण्यात आली. समितीने प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित संस्थेवर तातडीने कारवाईची मागणी केली.

समितीच्या आदेशानुसार मुलींचे त्वरित सुरक्षित ठिकाणी हस्तांतरण करण्यात आले. तसेच संबंधित संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांच्या विरोधात बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण व संरक्षण अधिकारी साधना हटवार, चाईल्ड हेल्पलाइन प्रतिनिधी अनिकेत भिवगडे, मीनाक्षी धडाडे, पूजा कांबळे,मेघा पाटील, मंगला टेंभुर्णे, सचिन धोतरकर, रंजीत कुंभारे, न्यू व्हिजन फाउंडेशनच्या प्रियंका होठे, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट च्या रूपाली वानखेडे, अश्विनी चौरे ,कोमल मेश्राम पारमिता गजभिये यांच्या पथकाने केली.