नागपूर : व्यवसायाने शिक्षिका असलेली महिला ऑटोने प्रवास करत असताना साडे चार लाखांच्या एवजाची बॅग गमावून बसली. पण दुसऱ्याच दिवशी महिलेला मंगळवारी सुखद धक्का बसला. निष्काळजीपणामुळे गहाळ झालेले रोख रक्कम एक लाख ७५ हजार, अडिच लाखांचे सोन्याचे दागीने भ्रमणध्वनी आणि ३ एटीएम आणि डेबिट कार्ड सुखरूप परत मिळाल्याने महिलेच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

समाजात माणसूकी आणि प्रामाणिकपणा अद्याप जीवंत आहे, याची साक्ष देणारी ही घटना लकडगंज पोलीस हद्दीत घडली. ममता नरेश यादव असे अनावधानाने मौल्यवान दागीने आणि रोख गमावून बसलेल्या महिलेचे नाव आहे. तर सचिन मोतीरामजी निखारे (४०) असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. सचिन यांना ही बॅग व त्यातील मुद्देमाल सापडला होता.

नेमकं काय घडलं महिलेसोबत….?

यादव नगरातील श्रीकृष्ण अपार्टमेंट येथील रहिवासी ममता यादव या ३१ ऑगस्टला अमर सिनेमागृहाजवळील जुना मोठा स्टँड चौक येथे खरेदीसाठी गेल्या होत्या. दरम्यान त्यांची बॅग हरवली. यात १ लाख ७५ हजार रुपये रोख, सोन्याचे दागीने आणि ३ एटीएम कार्ड होते. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलीस शोध घेत होते. दरम्यान मंगळवारी रिक्षाचालक सचिन मोतीरामजी निखारे (४०) अचानक लकडगंज पोलीस ठाण्यात पोहोचले.

शिक्षिकेला बसला सुखद धक्का….

त्यांनी ही बॅग व त्यातील मुद्देमाल आपल्याला सापडल्याचे सांगितले. सचिन निखारे यांनी कोणताही स्वार्थ न बाळगता प्रामाणिकपणे ही बॅग लकडगंज पोलीसांकडे सुपूर्द केली. बॅग परत करताना त्याने घड़लेला सर्व घटनाक्रमही पोलिसांना कथन केला. दरम्यान पोलिसांनी ममता यादव यांना ठाण्यात बोलावून घेतले. आपली रोख, दागीने आणि त्यातला भ्रमणध्वनी, ३ एटीएम कार्ड सुरक्षित असल्याचे पाहून यादव यांना सुखद धक्क्याने अश्रू अनावर झाले.

प्रामाणिक रिक्षा चालकाचा पोलिसांनी केला गौरव…

ध्यानी मनी नसताना ४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल सुरक्षित परत मिळाल्याने यादव कुटुंबाने रिक्षाचालक सचिन निखारे यांचे आभार मानले सचिन निखारे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यदक्षतेबद्दल लकडगंज पोलिसांनी निखारे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.