नागपूर : उपराजधानीतील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील मुलींच्या वसतिगृहात घडलेल्या रॅगिंग प्रकरणाचा छडा लावण्यात महाविद्यालयाच्या रॅगिंग प्रतिबंधक समितीला यश आले आहे. समितीने या प्रकरणात १९ वरिष्ठ विद्यार्थिनींना दोषी ठरवून त्यांची तीन महिन्यांसाठी वसतिगृहातून हकालपट्टी केली आहे. तसेच पुन्हा अशा प्रकारात सहभागी आढळल्यास महाविद्यालयातून काढून टाकण्याची तंबीही देण्यात आली आहे.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात मागील २० दिवसांत दोन वेळा कनिष्ठ विद्यार्थिनींची रॅगिंग झाल्याची निनावी तक्रार महाविद्यालय प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीत वरिष्ठ विद्यार्थिनींकडून नवीन विद्यार्थिनींचा छळ होत असून त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली होती. रॅगिंगचे प्रकार रात्री १० नंतर होत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येत नसल्याचेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर रॅगिंग प्रतिबंधक समितीने चौकशी सुरू करत वसतिगृहातील कनिष्ठ व वरिष्ठ विद्यार्थिनींचे स्वतंत्रपणे जबाब नोंदवले. नाव उघड करण्यात येणार नसल्याचा विश्वास समितीकडून देण्यात आल्याने कनिष्ठ विद्यार्थिनींनी ‘इंट्रोडक्शन’च्या नावाखाली होत असलेल्या छळाची कबुली दिली. त्यांनी त्रास देणाऱ्या १९ वरिष्ठ विद्यार्थिनींची ओळखही पटवून दिली. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने तातडीने संबंधित १९ विद्यार्थिनींची तीन महिन्यांसाठी वसतिगृहातून हकालपट्टी केली.

तसेच भविष्यात कोणत्याही नवीन विद्यार्थिनीला त्रास दिला जाणार नाही, याबाबत त्यांच्याकडून लेखी हमी घेण्यात आली आहे. पुन्हा रॅगिंग केल्यास प्रथम सहा महिन्यांसाठी महाविद्यालयातून निलंबन आणि त्यानंतरही प्रकार सुरू राहिल्यास कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात येईल, अशी स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे.

रात्री आकस्मिक तपासणी होणार

वसतिगृहात पुन्हा रॅगिंगसारखे प्रकार घडू नये, यासाठी महाविद्यालय प्रशासनाने गस्त वाढवणे, विद्यार्थिनींचे वेळोवेळी समुपदेशन करणे, तसेच रात्री उशिराही रॅगिंग प्रतिबंधक समितीकडून अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रॅगिंगचा त्रास सहन केलेल्या विद्यार्थिनींचे तातडीने समुपदेशन करून त्यांच्यातील भीती दूर केली जाणार आहे.

महाविद्यालयातील अधिष्ठात्यांचे म्हणणे काय ?

रॅगिंग प्रतिबंधक समितीच्या प्राथमिक चौकशीत १९ वरिष्ठ विद्यार्थिनींनी नवीन विद्यार्थिनींचे ‘इंट्रोडक्शन’ घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तातडीने त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आले आहे. रॅगिंग कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. — डॉ. राजेंद्र सोनेकर, अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर</p>