नागपूर : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून यावरून भाजप व काँग्रेस पक्ष आमने-सामने आले आहे. बुधवारी सकाळी नागपुरातही याचे पडसाद उमटले असून भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा मनोरुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. यावरून नागपूर राजकीय आखाडा होण्याची शक्यता आहे.
गुप्तपणे आंदोलन, अचानक पोहोचले कार्यकर्ते
राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी त्यांचा प्रतिकात्मक पुतळा मनोरुग्णालयात दाखल करणे व त्यावर उपचार करावा, या मागणीसाठी भाजयुमो कार्यकर्ते अत्यंत गुप्तपणे आज बुधवारी सकाळी पागलखाना चौकातील मनोरुग्णालयात आंदोलनासाठी पोहोचले. त्यामुळे मनोरुग्णालय प्रशासनातही धावपळ माजली. भाजयुमोचे शहर अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वात काही कार्यकर्त्यांनी डॉक्टरच्या वेशात येऊन पुतळ्यावर उपचाराचे नाट्य रंगवले. देशातील निवडणूक आयोग व भाजप नेत्यांवर मतचोरीचा आरोप राहुल गांधी सतत करत असून त्यांचा मेंदू चोरीला गेला आहे, त्यामुळे त्यांचा प्रतिकात्मक पुतळा मनोरुग्णालयात दाखल करण्यासाठी आणल्याचे भाजयुमो शहर अध्यक्ष करारे यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पद्धतशीरपणे मते बाद केली जात असून निवडणुका रिग्ड (फेरफार करून जिंकलेल्या) असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. मतदार याद्यांमधील फेरफार हे संविधानावर झालेला हल्ला असून हा देशद्रोह असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करीत राहुल गांधी यांचा मेंदू चोरीला गेल्याचा टोला लागवला आहे. हाच धागा पकडून नागपूर भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा पुतळा मनोरुग्णालयात आणला.
काँग्रेस -भाजप कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता
सोमवारी शहर काँग्रेसने निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा पुतळा जाळला होता. आज भाजयुमो कार्यकर्त्यांनी थेट राहुल गांधी यांचा पुतळा मनोरुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. भाजयुमो शहर अध्यक्ष करारे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमच्याशी लढावे असे आव्हान दिले. त्यामुळे आता युवक काँग्रेसकडून भाजयुमोलाही प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. परिणामी दोन्ही कार्यकर्ते एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे.
