नागपूर : शहराच्या सीमेलगतच्या बनवाडी परिसरातील सहारा सिटी गृहनिर्माण प्रकल्पात गेल्या तीन दिवसांपासून एका बिबट्याने मुक्काम ठोकल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूर शहराच्या वेशीवर यापूर्वीही अनेकदा बिबट्यांच्या शिरकावाच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी सहारा सिटी परिसरात वाघाचा देखील वावर आढळून आला होता. त्यामुळे नव्याने दिसू लागलेल्या बिबट्याने नागरिकांची चिंता अधिक वाढवली आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रथम बिबट्या दिसला. त्यानंतर सातत्याने तो दररोज सकाळी ७ ते ७.३० या वेळेत परिसरात मुक्तपणे फिरताना आढळत आहे. सहारा सिटीमधील एका निर्माणाधीन इमारतीच्या मजल्यावर तो बसलेला असल्याचे नागरिकांनी पाहिले असून त्याचे चित्रीकरणही करण्यात आले आहे.
सध्या हा गृहनिर्माण प्रकल्प अर्धवट अवस्थेत पडून आहे. परिसरात वाढलेल्या दाट झुडपांमुळे आणि मानवी वर्दळ कमी असल्याने ही जागा बिबट्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या बिबट्याने परिसरातील दोन ते तीन पाळीव जनावरांची शिकारही केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना भीती
सहारा सिटीच्या जवळच माउंट कार्मेल स्कूल असून परिसरातील अनेक गावांतील विद्यार्थी याच मार्गाने शाळेत ये-जा करतात. काही विद्यार्थी बसने शाळेत जाणे-येणे करत असले तरीही काही विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या दुचाकीने शाळेत सोडतात. नेमके बिबट्या ज्या वेळेत दिसत आहे, तीच विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्याची वेळ असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकरीही शेतात जाण्यास धास्तावत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांची शेतातील कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे आता ग्रामस्थांनीच आळीपाळीने काठ्या घेऊन परिसरात पहारा सुरू केला आहे. सामाजिक कार्यकर्ते राजेश उमाठे आणि मंगेश झाडे यांनी वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अशी मागणी केली आहे.
जंगल आणि शहरातील अंतर कमी
नागपूर शहर आणि आसपासच्या भागात गेल्या काही वर्षांत बिबट्यांच्या हालचाली वाढल्याचे चित्र आहे. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे जंगल आणि मानवी वसाहती यांतील अंतर कमी होत असून, वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास तुकड्यात विभागले जात आहेत. परिणामी बिबटे अन्न आणि आसऱ्याच्या शोधात मानवी वस्त्यांच्या जवळ येत असल्याचे वन्यजीव अभ्यासक सांगतात. सहारा सिटीतील ताज्या घटनेमुळे पुन्हा एकदा नागपूरच्या उपनगरांतील मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिहान, वाडी, गोरेवाडा, अंबाझरी परिसरात देखील बिबट्यांचे वास्तव्य आढळले आहे.
