नागपूर : बेलतरोडी पोलीस हद्दीतील न्यू मनीषनगरात चोरीच्या संशयावरून जमावाने मंगळवारी दुपारी दोन तरुणांना पकडून बेदम मारहाण केली. जमावाचा संताप पाहून एक जण स्वतःची सुटका करून घेत जीवाच्या आकांताने पळाला. तर तावडीत सापडलेला दुसरा जमावाच्या मारहाणीनंतर अंतर्गत जखमांमुळे दगावला. या घटनेनंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
जमावाकडून कायदा हाती घेत दिलेल्या बेकायदेशीर न्यायामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. सुमेध राजेंद्र गजभिये असे मंगळवारी दुपारी जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत दगावलेल्या तरुणाचे नाव आहे. चाकूच्या धाकावर त्याने एका साथिदाराच्या मदतीने निवासी संकुलात घुसून महिलेच्या गळ्याती मंगळसुत्र हिसकावल्याच्या संशयातून जमावाने त्याला बेदम मारहाण केली होती.
११२ क्रमांकावरून सुचना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला जमावाच्या तावडीतून सोडवत बेलतरोडी पोलीस ठाण्यात आणले होते. त्या नंतर अवघ्या १० मिनिटांत सुमेधने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याला मेडिकलमध्ये तपासणीसाठी नेले. तेथील डॉक्टर तपासत असतानाच सुमेध गजभियेचा मृत्यू झाला.
घटना नेमकी काय घडली… ?
न्यू मनीषनगर येथील मॉडेल मिल सोसायटीत मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास उषा देवीदास धार्मिक (६१) यांच्या घरात दोन तरुण घुसले. झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या पोशाखात शिरलेल्या या दोघांनी चाकूचा धाक दाखवून धार्मिक यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. महिलेने प्रतिकार करत आरडाओरड केला. त्यांचा आवाज एकून उषा यांची सुन धावत आली. आरोपींनी त्यांनाही धाक दाखवत दागीने मागितले. दरम्यान सून मुलाला खोलीत ठेवण्याचा बहाण्याने आत गेली आणि तिने आतून दार बंद केले. नंतर तिने पती आणि शेजाऱ्यांना माहिती दिली.तडक धावलेले नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी परिसरात शोध घेत काही अंतरावर सुमेध राजेंद्र गजभिये आणि त्याचा साथीदार दीपक पाटील यांना पकडले. मारहाण करत जमाव दोघांनाही घेऊन कॉलनीत आला. तिथेही जमावाने दोघांना मारहाण केली. दरम्यान जीवाच्या आकांताने दिपक पाटील जमावाच्या तावडीतून स्वतःला सोडवत पळाला. परिसरातील काही नागरिकांनी ११२ क्रमांकावरून पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाने सुमेधसह तिघांना ठाण्यात आणले. दरम्यान सुमेधची प्रकृती बिघडली. त्याला तपासणी व उपचारासाठी मेडिकलमध्ये नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांकडून संकुलातील सीसीटीव्हीची तपासणी
चोरीचा संशय घेऊन जमावाने कायदा हातात घेऊन मारहाण केल्यानेच सुमेध गजभियेचा मृत्यू झाल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. मात्र सुमेधचा मृत्यू नेमका मारहाणीमुळे झाला की अन्य कारणामुळे, याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच होणार आहे. सुमेधच्या शरीरावर खुणा नसल्या तरी त्याला जमावाच्या मारहाणीत अंतर्गत जखमा आणि रक्तस्त्राव झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात कोणाची नेमकी काय भूमिका होती, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरू केली आहे.
पोलीसांची भूमिका काय…?
जमावाकडून झालेल्या मारहाणीची घटना समोर येताच सह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त दिपक अग्रवाल, रश्मिता राव यांनी तडकाफडकी बेलतरोडी पोलीस ठाणे गाठले. संतप्त जमावाने बेकादेशीररित्या केलेल्या या मारहाणीनंतर पोलिसांनी सावध पवित्रा घेत अकस्मात मृत्यूची नोंद केली. सुमेध गजभियेच्या मृत्यूच्या कारणांचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. डॉक्टरांनी अनैसर्गिक अथवा अंतर्गत जखमांचा अहवाल दिला तर कायदेशीररित्या कलम वाढवले जाईल, असे पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांनी स्पष्ट केले.
