नागपूर : अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला ‘आय लव्ह यू’ म्हणणाऱ्या आरोपीवर ‘पोक्सो’ अंतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा गुन्हा रद्द केला व ‘आय लव्ह यू’ म्हटल्याने लैंगिक छळाचा उद्देश स्पष्ट होत नाही, असे निरीक्षण नोंदवले. न्या. उर्मिला जोशी-फाळके यांनी हा निर्णय दिला.
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील खापा गावात पीडित अल्पवयीन मुलगी राहत होती. २३ ऑक्टोबर २०१५ रोजी ती शाळेतून परत येत असताना आरोपीने पीडितेशी त्याने बोलण्याचा प्रयत्न केला. तिचा हात पकडला आणि ‘आय लव्ह यू’ म्हणाला. घरी परतल्यावर पीडितेने हा प्रकार वडिलांना सांगितला. यानंतर काटोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी नागपूर सत्र न्यायालयाने आरोपीला १८ ऑगस्ट २०१७ रोजी तीन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. आरोपीने या विरोधात उच्च न्यायालयात अपील केले. उच्च न्यायालयाने लैंगिक छळाची परिभाषा स्पष्ट करत आरोपीची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय दिला.
न्यायालय काय म्हणाले?
एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे? त्याचा नेमका उद्देश काय? हे माहीत करण्यासाठी आसपासच्या परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे असते. शारीरिक स्पर्शाला लैंगिक छळ म्हणता येईल. एखादी व्यक्ती शब्दांच्या माध्यमातून शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यालाही लैंगिक छळाच्या श्रेणीत जोडता येईल, मात्र केवळ आय लव्ह यू म्हणणे लैंगिक छळाच्या उद्देशातून उच्चारलेले शब्द मानता येत नाही, असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.