नागपूर : अन्न व औषध प्रशासनाचे धाडसी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारभार हाती घेतल्यापासून एकामागून एक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. कधी दुध डेअरी, कधी दुग्धजन्य पदार्थ उत्पादक, कधी औषधालये तर कधी हाॅटेलसह गुटखा आणि तंबाखू जन्य पदार्थ. अशा कारवायांची मालिकाच त्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे उपराजधानीतले गुटखा आणि खर्रा विक्रेते भूमिगत झाले आहेत.
तुकाराम मुंढे यांच्या या कारवाईमुळे संपूर्ण राज्यात भेसळखोरांमधे खळबळ उडाली आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्या या धाडसीपणाचे जनमानसात स्वागतही होत आहे. असे असताना देखील सुपारीचे हब म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या नागपूरात मात्र सुपारीच्या काळाबाजारावर पूर्णविराम लागलेला नाही. बनावट कागदपत्रांच्या आधारे आणलेली आयातीत सुपारी, स्थानिक स्तरावर नव्या पॅकिंगमध्ये भरून बाजारात विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कोट्यवधींची रोज होते उलाढाल…
नागपूर हे खर्रा विक्रीतून होणाऱ्या उलाढालीची राजधानी म्हणून ओळखले जाते. संपूर्ण राज्यात जितकी सुपारी महिन्याभरात विकली जाते, तितकी सुपारी एकट्या नागपूर जिल्ह्यात रोज विकली जाते. यावरून या उलाढालीचा अंदाज येऊ शकतो. या व्यवसायातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
नेहमीच कारवाया पण व्यवसाय सुरूच…
सुपारी व्यावसायिकांवर होणारी कारवाई नागपुरात नवी नाही. तपास यंत्रणांनी यापूर्वी अनेक ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात सुपारी जप्त केली आहे. मात्र, या कारवायांनंतरही परिस्थीती जशास तशी राहते. आता मुंढे यांच्या कारवाईसत्रानंतर यावसायिकांनी नवीन मार्ग अवलंबत हा अवैध व्यवसाय सुरूच ठेवल्याचे वृत्त आहे. विशेषतः नागपुरातील काही गोदामांमध्ये सुपारीचे पॅकिंग बदलून ती कायदेशीर असल्याचा आभास निर्माण केला जात आहे.
पुरवठा साखळी संघटीत…
नागपुरातील सुपारीची पुरवठा साखळी संघटित आहे. शहर आणि शराभोवतीची गोदामे, वाहतूक आणि आर्थिक व्यवहारांमध्ये गुप्तता पाळली जाते. काही महिन्यांपूर्वीच केंद्रिय आयकर विभागाने शहरातील बड्या सुपारी व्यावसायिकांवर छापे टाकत तीन कपाटभर पुरावे गोळा केले होते. या व्यापाऱ्यांकडे कोट्यवधींची बेहिशेबी कागपत्रे आयक विभागाने सील केली होती. तरीही सुपारीची उलाढाल थांबलेली नाही.
काळाबाजारामागे रॅकेट…
आयकर विभागापाठोपाठ केंद्रित मंत्रालयाच्या महसूल गुप्तचर यंत्रणा देखील कर चुकवून परदेशातून आयात होणाऱ्या सुपाऱ्यांवर कारवाया करत असते. त्यामुळे मुंढे यांच्या कारवाईतून धडा घेत केंद्रित मंत्रालयाच्या दोन्ही यंत्रणांनी परस्पर समन्वयातून या गोरखधंद्यातील रॅकेट उघडे केले तर मुळावर घाव घातला जाऊ शकतो, असा सूर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
