नागपूर: भारत युवक संसदचे अधिवेशन नागपूरमधील रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती भवनात आयोजित करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या समन्वयात राबवला जात आहेत. या कार्यक्रमासाठी सरकारी निधी वापरला जात असला तरी युवक संसदेसंबंधी माहिती गुप्त ठेवली जात असल्याने चर्चाला उधान आले आहे . कार्यक्रमात सरकारी निधी वापरला जात असताना गुप्तता का बाळगली जाते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पडद्याआड काय घडते आहे?

सरकारी खर्चातून आयोजित केले जाणारे भारत युवक संसदचे अधिवेशन गुप्ततेच्या पडद्यामागे चालत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. देशभरातून आलेल्या युवकांना येथे कोणते प्रशिक्षण दिले जाते, कोण मार्गदर्शन करतो आणि कोणते विषय शिकवले जातात, याची माहिती जनसामान्यांना उपलब्ध का केली जात नाही. या अधिवेशनातून मिळणारी माहिती, प्रशिक्षणाचे स्वरूप आणि उद्देश याबाबत माध्यमांना दूर का ठेवण्यात येत आहे, असेही आता विचारले जाऊ लागले आहे.

व्हीव्हीआयपींची पत्रिकेत नावे

केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठ यांच्या संयुक्त आयोजनाखाली हे अधिवेशन पार पडत आहे. यासोबत मिडिया फाऊंडेशनचा देखील सहभाग आहे. अधिवेशनात उपराष्ट्रपती, केंद्रीय शिक्षण मंत्री, केरळचे राज्यपाल, तेलंगणाचे राज्यपाल, नागालँड आणि उत्तराखंड विधानसभा अध्यक्ष, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मार्गदर्शन करतील, असे सामाजिक माध्यमांवरील एका पत्रिकेत नमूद केले आहे.

गोपनीयतेमुळे कार्यक्रमाबाबत प्रश्न

सरकारमधील उचपदस्थी मंडळी या अधिवेशनात येत असताना गुप्तता बाळण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. युवक संसदेत कोणते मूल्य, नेतृत्व कौशल्य किंवा धोरणात्मक प्रशिक्षण दिले जाते, हे नागरिकांना अद्याप स्पष्ट झालेले नाही. या गोपनीयतेमुळे कार्यक्रमाबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.

संस्कृत विद्यापीठाची भूमिका: केवळ सहकार्याची

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठाची भूमिका केवळ सहकार्यांची आहे. आम्ही व्यवस्थापनात मदत करण्यासाठी तसेच विद्यार्थी उपलब्ध करून देण्यापुरते आहोत; आयोजनाशी थेट संबंध नाही. माध्यमांना निमंत्रण न दिल्याबद्दल आश्चर्य वाटले, असे कवी कुलगुरू, कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांनी सांगितले. तसेच पत्र सूचना कार्यालयाला (पीआयबी) या कार्यक्रमाची प्रसिद्धीची सूचना नसल्याचे समजते.

संवाद हाच उपाय: उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी शनिवारी युवक संसदेत भाषण केले. यावेळी त्यांनी जागतिक परिस्थितीवर भाष्य करत सांगितले की संवाद आणि चर्चा हेच समस्यांचे निराकरण करण्याचे प्रभावी मार्ग आहेत. “आज जग युद्धाच्या गंभीर धोक्याखाली उभे आहे. अशा परिस्थितीत संवाद हाच समस्यांचे निराकरण करण्याचा एकमेव प्रभावी मार्ग आहे.”

त्यांनी भारताच्या प्रगतीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. देशातील सुमारे ६० टक्के लोकसंख्या २५ वर्षांखालील असल्यामुळे युवकांसाठी शिक्षण, कौशल्य आणि नेतृत्व विकासावर विशेष भर दिला जात आहे. युवक संसद तरुणांना विचारमंथन, संवाद आणि नेतृत्वाचे धडे देणारे प्रभावी व्यासपीठ आहे, असे त्यांनी नमूद केले.