नागपूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीने १ नोव्हेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर एका मोठ्या मोर्चाची आणि महारॅलीची हाक दिली आहे. ‘मतचोरी’ रोखण्यासाठी आणि लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी ‘चलो दिल्ली’ या घोषणेसह हा महामोर्चा काढण्यात येत आहे. भाजपनेही कॉंग्रेसच्या मोर्चाला मोर्चाने उत्तर देण्याची तयारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी या मोर्चाचे नेतृत्त्व करणार असल्याचे आमदार परिणय फुके यांनी सांगितले.
कुठे आणि कधी आहे मोर्चा?
विदेशातून मिळणाऱ्या फंडाच्या आधारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी देशातील संविधानावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला असून येत्या ५ नोव्हेंबर रोजी संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात मोर्चा निघणार आहे, अशी माहिती आमदार परिणय फुके यांनी दिली. आमदार परिणय फुके त्यांच्या रामनगर येथील निवासस्थानी प्रसारमाध्यमासोबत बोलत होते.
मोर्चात कॉंग्रेसप्रमाणेच लोकशाही बचावचा नारा
५ नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या मोर्चात लोकशाही बचाव हा नारा दिला जाणार. या मोर्चात सर्व देशभक्त सहभागी होणार असून कॉंग्रेसच्या अराजकता पसरविण्याच्या हेतूला सुरुंग लावण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे कॉंग्रेसच्या नाऱ्यातही लोकशाही बचाव शब्द असून मतचोरीविरोधात ज्ञानेशकुमाराच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याचवेळी भाजपने ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ असा नारा दिला आहे.
महायुतीमध्ये भांडणे लावण्यासाठी काँग्रेसची धंगेकरांना सुपारी, आमदार फुकेंचा आरोप
डॉ. फुके यांनी यावेळी नुकताच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीवरून सुरू असलेल्या महायुतीतील नेत्यांच्या वक्तव्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, निवडणुकांमध्ये पराभव झाल्याने कार्यकर्ते टीकाटिपणी करत आहे. पुढील दोन तीन दिवसात वरिष्ठ नेते बैठक घेऊन मार्ग काढतील. रविंद्र धंगेकर काल परवा शिवसेनेत आले. विधानपरिषदेत जाण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. आधी ते कॉंग्रेसमध्ये होते. आता महायुतीमध्ये भांडणे लावण्यासाठी काँग्रेसने त्यांना सुपारी दिली आहे, असा आरोप आमदार डॉ. फुके यांनी केला.
राहूल गांधी देशासाठी ‘रेड फ्लॅग’
आम्ही या निवडणुकीत कुठे कमी पडलो यावर आत्मचिंतन करणार आहोत, यात दुमत नाही. यावेळी त्यांनी राहूल गांधी यांच्यावरही टीका केली. राहूल गांधी स्वत: देशासाठी ‘रेड फ्लॅग’ (संकट) आहे. संविधान संपवून कडवी डावी विचारसरणी आणण्याचा ते प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांच्या नावात राहू आहे, त्यामुळे ते देशात राहू आणण्याचा काम करत आहे, असा टोला त्यांनी लगावला. डॉ. फुके यांनी गरीबी कमी झाल्याचाही दावा केला. नुकताच आलेल्या अहवालातून ५० टक्के गरिबी कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. ही राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्याला चपराक आहे. या देशात मागील बारा वर्षांत विदेशी गुंतवणूक आल्याने देशाचा मोठा विकास झाल्याचे आमदार डॉ. फुके म्हणाले.
