चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचा मला आनंद आहे. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भाजपची पाळेमुळे आणखी घट्ट होतील, अशी प्रतिक्रिया भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.

मुंबईहून नागपूरला आगमन झाल्यावर ते विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. बावनकुळे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांची कामगिरी चांगली होती.ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडली. याची दखल घेत पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यात अधिक मजबूत होईल, असे फडणवीस म्हणाले.

गृहखाते कोणाकडे असावे यावरून खातेवाटप थांबले का? असा प्रश्न फडणवीस यांना विचारला असता ‘ तुम्ही पतंग उडवत रहा, आम्ही लवकरच खातेवाटप करू’ असे ते म्हणाले.

राज्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले.अद्याप त्यांना मदत मिळाली नाही.याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, पीक हानीचे क्षेत्र वाढते आहे.पंचनामे सुरू आहे. लवकरच मदत दिली जाईल, असे फडणवीस म्हणाले संजय शिरसाट यांचे व्टिट मी बघितले नाही त्यामुळे यावर बोलणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.