नागपूर : बोईंग कंपनी जुन्या प्रवासी विमानांना मालवाहू विमानांमध्ये परावर्तीत करण्याचा प्रकल्प हाती घेणार आहे. हा प्रकल्प नागपुरात सुरू होणार असल्याने नागपूर मालवाहू विमानांच्या निमिर्तीचे केंद्र होऊ शकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘संरक्षण क्षेत्रातील संधी’ यावर परिसंवाद झाला. याप्रसंगी गडकरी बोलत होते. यावेळी अनुरक्षण कमान मुख्यालयाचे प्रमुख एअर मार्शल व्ही. के. गर्ग, एअर मार्शल संजीव घुराटिया, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) संजय वर्मा, व्हीडीआयएचे अध्यक्ष तसेच मेजर जनरल (निवृत्त) अनिल बाम, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, भारताने शस्त्र निर्मितीमध्ये आघाडी घेतली आहे. पूर्वी आपला देश मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची आयात करीत होता. आता आपल्या देशातील खासगी कंपन्या शस्त्रास्त्र निर्यात करू लागल्या आहेत. विदर्भाला संरक्षण शस्त्रास्त्रांच्या निर्मितीचे हब बनवायचे आहे. येथून केवळ भारतभर नव्हे संपूर्ण जगात निर्यात होईल. एअर मार्शल संजीव घुराटिया म्हणाले, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास देशातील खासगी कंपन्यांद्वारे सशस्त्र दलांना हव्या असलेल्या शस्त्रास्त्रांची उपलब्धता सहज होऊन देश या क्षेत्रात खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ शकेल. डॉ. भीमराया मैत्री म्हणाले, शांघाय हे संपूर्ण जगाचे मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखले जायचे. आता हे चित्र बदलत असून भारत संपूर्ण जगात पुरवठा करीत आहे.

खासगी कंपन्या भारताला आत्मनिर्भर करतील गर्ग संरक्षण क्षेत्रातील आयात कमी करण्यात खासगी कंपन्यांची मदत होत आहे. सशस्त्र दलांच्या गरजा लक्षात घेता भारतीय खासगी कंपन्यांनी उत्पादन वाढवण्याची आवश्यकता आहे. खासगी कंपन्यांमुळे भारत आत्मनिर्भर होऊ शकेल, असा विश्वास एअर मार्शल व्ही. के. गर्ग यांनी व्यक्त केला.

Story img Loader