नागपूर : भारताच्या ब्रिक्स २०२६ अध्यक्षपदाअंतर्गत नागपुरात ब्रिक्स देशाच्या परिवहन कार्यगटाच्या तिसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीला गुरुवारी प्रारंभ झाला.बैठकीत शाश्वत परिवहन, परिवहनाचे डिजिटलीकरण, शाश्वत विमान इंधन, शहरी गतिशीलता, रेल्वे संशोधन, रसद व्यवस्था आणि परिपत्र अर्थव्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर ११ सदस्य देशांमध्ये चर्चा सुरू आहे.या बैठकीत कोणते मुद्दे चर्चेत आहेत आणि भारतासाठी ही बैठक का महत्त्वाची आहे, जाणून घेऊया…

नागपुरात नेमकी कोणती बैठक सुरू आहे?

भारताच्या ब्रिक्स २०२६ अध्यक्षपदाअंतर्गत नागपुरातील बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांतील वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी सहभागी झाले असून, ११ जुलै रोजी होणाऱ्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी विविध विषयांवर अंतिम चर्चा केली जात आहे. परिवहन क्षेत्रात ब्रिक्स सदस्य देशांमधील परस्पर सहकार्य अधिक मजबूत करणे, शाश्वत विकासाला चालना देणे, नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आणि भविष्यातील परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी समान धोरण तयार करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे.

कोणकोणत्या विषयांवर चर्चा सुरू आहे ?

परिवहन क्षेत्रातील परिपत्र अर्थव्यवस्था, शाश्वत बांधकाम, शहरी गतिशीलता, रेल्वे संशोधन, रसद व्यवस्था, शाश्वत विमान वाहतूक, परिवहनाचे डिजिटलीकरण आणि शाश्वत विमान इंधन या महत्त्वाच्या विषयांवर सदस्य देशांमध्ये सविस्तर चर्चा होत आहे.

परिवहन मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर काय म्हणाले ?

व्ही. उमाशंकर एएनआयशी बोलतांना म्हणाले की, ही परिवहन कार्यगटाची तिसरी मंत्रिस्तरीय बैठक आहे. परिवहन क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी चर्चा सुरू असून, आज किंवा उद्यापर्यंत या चर्चांचा निष्कर्ष निघण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर ११ जुलै रोजी मंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी होऊ शकते.

भारताने यंदाच्या अध्यक्षपदासाठी कोणत्या बाबींना प्राधान्य दिले आहे ?

उमाशंकर यांच्या मते, भारताने आपल्या अध्यक्षपदासाठी नवकल्पना, सहकार्य आणि लवचिकता या संकल्पनांना प्राधान्य दिले आहे. शाश्वत विकासासाठी लवचिकता हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, सर्व सदस्य देशांनी या समान उद्दिष्टांसाठी एकत्र काम करावे, असा भारताचा प्रयत्न आहे. भारताच्या अतिथी देवो भव या परंपरेनुसार सर्व परदेशी प्रतिनिधींना उत्तम आदरातिथ्य दिले जाईल. नागपुरातील आयोजन आणि स्वागतामुळे सर्व प्रतिनिधींना चांगला अनुभव मिळेल, असा विश्वास व्ही. उमाशंकर यांनी व्यक्त केला.

ब्राझीलच्या प्रतिनिधीने काय भूमिका मांडली?

ब्राझीलचे प्रतिनिधी लुकास गोदोय बार्बोसा एएनआयशी बोलतांना म्हणाले, भारताच्या अध्यक्षपदातील सर्व प्राधान्यक्रमांना सदस्य देशांचा पाठिंबा आहे. परिवहनाचे डिजिटलीकरण, शाश्वत विमान इंधन, परिपत्र अर्थव्यवस्था आणि गतिशीलता या विषयांवर सर्व सदस्य देशांमध्ये एकमत झाले असून, ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ब्राझील भारतासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे. यापूर्वीच्या ब्रिक्स बैठकीत सुरू झालेले काम भारताने विविध आभासी बैठका, धोरणात्मक चर्चासत्रे आणि कागदपत्रांवरील चर्चांच्या माध्यमातून प्रभावीपणे पुढे नेले आहे. त्यामुळे सदस्य देशांमध्ये समन्वय अधिक मजबूत झाल्योच बार्बोसा म्हणाले.

११ जुलैच्या मंत्र्यांच्या बैठकीत कोणत्या मुद्यावर चर्चा अपेक्षित आहे?

११ जुलै रोजी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स परिवहन मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत परिवहन क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करणे, शाश्वत विकासाला चालना देणे, लवचिकता वाढविणे, भविष्योन्मुख गतिशीलतेला प्रोत्साहन देणे आणि महत्त्वाच्या सामंजस्य करारांना अंतिम मान्यता देण्याची शक्यता आहे.