नागपूर : विदर्भातील कोळसा वाहतूकीचा मुख्यमार्ग डुमरी खुर्द रेल्वे सायडिंगवरील कोळसा हाताळणीच्या कामात १ हजार ४२७ मेट्रिक टन कोळशाच्या घोटाळा प्रकरणात सोमवारी केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली. या प्रकरणात भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता सीबीआयच्या नागपूर पथकाने सोमवारपासून पश्चिम बंगालमधील एस. जे. एंटरप्रायझेस या कंपनीसह रेल्वे अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी झाडाझडती सुरू केली.
सीबीआयमधील अधिकाऱ्यांनी याला दुजोरा देताना कंपनीच्या आवारात झडती घेतली जात असल्याचे स्पष्ट केले. यात कंपनीने रेल्वे परिसरातील ‘रिजेक्ट’ किंवा ‘वेस्ट’ कोळसा असल्याचा बनाव करून उच्च दर्जाचा कोळसा खुल्या बाजारात विकल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले होते. सीबीआयने घेतलेल्या नमुन्यांचे केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्थेने तपासणी केली. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सीबीआयकडून ही झडती घेतली जात आहे.
कोळसा जी-१२दर्जाचा असल्याचे प्रमाणिकरण….
गोपनीय माहितीच्या आधारे या प्रकरणात सीबीआयने २१ मे रोजी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्य्लूसीएल) सतर्कता विभागासह संयुक्त तपासणी केली होती. या तपासणीत रेल्वे परिसरात तब्बल १ हजार ४२७ मेट्रिक टन कोळशाचा साठा आढळून आला. त्याचे नमुने तपासणीसाठी केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्थेकडे पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालात हा कोळसा जी-१२दर्जाचा कोळसा असल्याचे प्रमाणिकरण या संस्थेने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले.
सफाई कंत्राटाचा अफरातफरीसाठी गैरवापर…
तपासादरम्यान, एस. जे. एंटरप्रायझेसला सप्टेंबर २०२५ मध्ये दहा वर्षांसाठी रेल्वेच्या डुमरी खुर्द आणि तिरोडी स्थानकांवरील बॉक्सएन वॅगन व ट्रॅक साफसफाईचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, या कंत्राटाच्या अटींचा गैरफायदा घेत कंपनीने डब्ल्यूसीएलच्या सायडिंग परिसरातील कोळसा गोळा करून त्याची अफरातफर केल्याचा प्रकार समोर आला होता.
७२० मेट्रिक टन कोळसा ‘रिजेक्ट’ दाखवून विकला
सीबाआयकडून दाखल एफआयआर नुसार रेल्वेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने २१ आणि २४ मार्च रोजी १८ गेट पास जारी करण्यात आले. त्याच्या आधारे कंपनीने ७२० मेट्रिक टन जी-१२कोळसा ‘रिजेक्ट मटेरियल’ म्हणून बाहेर काढून विकला. यामुळे कंपनीला सुमारे २८ लाख ८० हजार रुपयांचा आर्थिक लाभ झाला. त्यामुळे डब्ल्यूसीएल कंपनीचे तितक्याच रकमेचे नुकसान झाल्याचा उल्लेख आहे.
तपासाची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर…
या प्रकरणात भारतीय सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एस. जे. एंटरप्रायझेसचे मालक अमित मैती तसेच सार्वजनिक सेवक आणि इतर संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाची जबाबदारी सीबीआयचे उपअधीक्षक नीरज कुमार गुप्ता यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
