नागपूर : तब्बल १५ वर्षाांनी जनगणना करण्यात येत आहे. याचे काम दोन टप्प्यात होत आहे. पहिल्या टप्प्यात घरगणनेचे काम होत आहे. तर प्रत्यक्ष जनगणनेचे काम पुढील वर्षी होईल. घरगणनेसाठी पर्यवेक्षक व प्रगणक घरोघरी जाऊन माहिती गोळा करीत आहे. परंतु काही ठिकाणी नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी प्रगणकांना घरीच येऊ दिले जात नाही, काहींच्या घरांना कुलूप असल्याने माहिती गोळा करण्यास मोठा अडळथा येत आहे. त्यातच काहींकडून प्रगणकांशी अपशब्दाचा वापर करून माहिती देण्यास असहकार्य करण्यात येत आहे. प्रशासनाने अशा लोकांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
जनगणने अंतर्गत घरगणनेसाठी आलेल्या प्रगणकांशी अपशब्द बोलून असहकार्य करणाऱ्या दोन व्यक्तींच्या विरोधात नागपुरातील सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रगणकांच्या तक्रारी काय?
केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन टप्प्यात हे काम होणार असून पहिल्या टप्प्यात घरगणना करण्यात येत आहे. १६ मे ते १४ जून या काळात हे घरगणनेचे काम करण्यात येत आहे. या घरगणनेसाठी प्रगणक घरोघरी भेटी देऊन माहिती गोळा करण्याचे काम करीत आहेत. परंतु काही ठिकाणी त्यांना नागरिकांकडून असहकार्य केले जात आहे. तर काहींकडून अपशब्दाचा वापर करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
काय घडले नेमके
शिक्षण व्यवसायाशी संबंधित असलेल्या सृष्टी वासे या घरगणनेची माहिती घेण्यासाठी सक्करदरा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या हर्ष अपार्टमेंट येथे गेल्या होत्या. त्यांच्यासोबत आणखी एक कर्मचारी सोबत होते. येथील नाना भगत व अणे यांनी माहिती दिली नाही. उलट ‘तुमचा मोबाईल ॲप खोटा असून जनगणनेची माहिती न घेता दुसरीच माहिती घेत असल्याचे म्हणत माहिती देणार नसल्याचे’ सांगितले. त्याच प्रमाणे इतरांना माहिती देऊ नका, असे सांगितले. सोबतच अर्वाच्य भाषेचा वापर केला. यासंदर्भात प्रगणक सृष्टी वास यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
नागरिकांचे असहकार्य
केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले आहे. परंतु घरगणनेसाठी घेण्यात येणाऱ्या माहिती ओबीसीचा स्वतंत्र समावेश नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणना करण्यावर ओबीसी संघटनांकडून संशय व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी आंदोलनही करण्यात आले. काही नागरिकांकडून बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
