नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदींवानांमध्ये मंगळवारी सकाळी तुंबळ हाणामारीची घटना समोर आली आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनी या संदर्भात रितसर धंतोली पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी सकाळी विचाराधीन बंदींमध्ये सकाळी अचानक वाद झाला. या वादाचे पर्यवसन नंतर बंदीवर झालेल्या लाथाबुक्क्यांच्या हाणामारीत झाले. यात जवळच ठेवलेल्या प्लास्टिकच्या बादलीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

दरम्यान भांडण सोडवून दोघांनाही शांत करण्यासाठी गेलेल्या कारागृह कर्मचाऱ्यांशीही एका बंदीवानाने हुज्जत घालत धक्काबुक्की केली. कर्मचाऱ्याला धमकावून झडप घालण्याचा प्रयत्न केल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.

हनुमान मंदिरातून परतताना पडली ठिणगी

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास मध्यवर्ती कारागृहातील छोटी गोल विभागातील बैरक क्रमांक ७ आणि ८ दरम्यान ही घटना घडली. विचाराधीन बंदी विजय रहांगडाले हनुमान मंदिरात दर्शन घेऊन बैरककडे परतत असताना दुर्गेश उर्फ लिटिल प्रमोद गुप्ता आणि अश्विन उर्फ अच्छी मुकुंद इंदुरकर यांनी त्याचा रस्ता अडवला. त्यानंतर दोघांनी विजयसोबत हुज्जत घालत मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर त्याच्या डोक्यावर प्लास्टिकच्या बादलीनेही वार करण्यात आल्याची माहिती आहे. विजयच्या आरडाओरडीनंतर ड्युटीवरील कारागृह कर्मचारी मनोज धनवट यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही बाजूंना वेगळे केले आणि जखमी विजयला जेल रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.

कारागृह कर्मचाऱ्यालाही धक्काबुक्की

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्याची कारवाई सुरू असतानाच आणखी एका विचाराधीन बंदीने कारागृह कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचे समोर आले आहे. सुरेंद्र उर्फ मोनू मनोज समुद्रे याने कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याचा आरोप आहे. उपनिरीक्षक निमजे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो शांत होण्याऐवजी त्यांच्याशी वाद घालत झडप घालण्याचा प्रयत्न करू लागला. तसेच सरकारी कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याला धमकावल्याचाही आरोप आहे. या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने धंतोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी दुर्गेश उर्फ लिटिल गुप्ता, अश्विन उर्फ अच्छी इंदुरकर आणि सुरेंद्र उर्फ मोनू समुद्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

न्यायालयाकडे अहवाल

या घटनेमुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान झालेल्या प्रकाराबाबत तुरुंग प्रशासानाने हाणामाऱ्या करणाऱ्या संबंधित कैंद्यांबाबत न्यायालयाला अहवाल सादर केला आहे. विचाराधिन बंदिवानांमध्ये ही हाणामारी झाल्याने येथील सराईत गुन्हेगार कैदी आणि नवखे कैदी यांच्यातील अंतर्गत वर्चस्वाचा मुद्दा एरणीवर आला आहे.