नागपूर : मध्यरात्रीच्या सुमारास घोरत असल्याने झोपेतून उठवल्याच्या संतापातून मध्यवर्ती कारागृहात बंदी असलेल्या कैद्यांमध्ये बुधवारी पहाटे तुंबळ हाणामारी झाली. यात एका कैद्याच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातल्या बडी गोल परिसरातल्या बराक क्रमांक चारमध्ये बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. मनिष चैतराम ठाकूर (२९) असे बंदीवानाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या बंदीवानाचे नाव आहे. मनिष याला सतिश राजन पैसाडेली या दुसऱ्या बंदिवानाने ही मारहाण केली.
नेमकी घटना काय घडली…..?
धंतोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर मध्यवर्ती कारागृहातल्या बडी गोल परिसरातील बराकक्रमांक ४ मध्ये ही घटना घडली. यात सतिश पैसाडेली हा एका बलात्कार प्रकरणात न्यायालयीन बंदी होता. त्याच बराकीत मनिष ठाकूर हा देखील बंदीवान आहे. बुधवारी पहाटे गाढ झोपेत असताना सतिश पैसाडेली हा घोरत होता. त्याच्या घोरण्याच्या आवाजामुळे मनिष ठाकूर याला झोप येत नव्हती. त्यामुळे मनिषने पहाटे साडेचारच्या सुमारास सतिशला झोपेतून उठवले. तुझ्या घोरण्यामुळे मला झोप लागत नाही. त्यामुळे तू घोरू नको, असे तो सतिशला म्हणाला. त्यावरून राग आल्याने सतिशने आधी मनिषशी वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
उजव्या डोळ्याला झाली खोल जखम
घोरण्याच्या कारणावरून सतिश पैसाडेली आणि मनिष ठाकूर या दोघांमधील भांडण इतके विकोपाला गेले की दोघांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली. यात सतिषने मनिषला लाथाबुक्यांनी मारहाण केली. पहाटेच्या वेळी सगळे बंदिवान णि झोपेत असतानाच या दोघांमध्ये झालेले भांडण आणि वादावादी नंतर सगळेच कैदी उठले. दरम्यान संदेश वेणू नाईक या तिसऱ्या बंदिवाने दोघांमध्ये सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी करत वाद सोडवला. मात्र तोवर सतिष ठाकूर याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्याला रक्त बंबाळ अवस्थेत नंतर मेडिकलमध्ये नेण्यात आले. कारागृहातील बराकीत कर्तव्यावर तैनात पोलीस शिपाई सुनिल फुललुके यांच्या तक्रारीनंतर धंतोली पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या सतिश पैसाडेली विरोधात प्राणघातक हल्ल्याचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला.
