नागपूर : मदगडी चिरेबंदीला केवळ शिक्षेची जागा न मानता सरकारने त्याचे ‘सुधारगृह’ नावाने नव्याने बारसे केले आहे. त्यामुळे ज्या हातून कधी गुन्हा घडला, त्याच हातांना आता कारागृहाच्या दगडी भिंतींत कौशल्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. यातून नागपूर मध्यवर्ती कारागृहाने चमत्कार घडवला आहे. येथील बंदिवानांनी मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर ५ वर्षांत तरुंग प्रशासनाला १४ कोटी ५१ लाख ५८ हजारांचा भरघोस महसूल मिळवून दिला आहे.

कारागृहातील कारखान्यांचे उत्पन्न अवघ्या दीड कोटींवरून वार्षिक ४ कोटी रुपयांच्या पार पोहोचले आहे. बंदिवानांच्या दुप्पट संख्येमुळे येरवडा कारागृहाचा महसूल राज्यात सर्वाधिक असला तरी नागपूर मध्यवर्ती कारागृहाने देखील गेल्या पाच वर्षांमध्ये विक्रमी मजल मारली आहे.

येथील बंदिवानांनी तयार केलेल्या सुतारकामाच्या वस्तू, बेकरी उत्पादने आणि वस्त्रोद्योगातील मालाला बाजारात मागणी मिळत आहे. कोरोना पूर्व काळात तुरुंग प्रशासनाला विविध कारखान्यांमधून सरासरी दीड कोटींचा महसूल मिळायचा. त्यानंतर मात्र यात वेगाने वाढ होऊन उत्पन्नात सुमारे २६५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

या कारखान्यांनी मारली बाजी

कारागृहातील दगडी चिरेबंदी आडच्या सुतारकाम विभागाने विक्रमी महसूल मिळवत तुरुंग प्रशासनाच्या तिजोरीत भर घातली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये एकट्या सुतारकामातून तुरुंग प्रशासनाला ५ कोटी ३४ लाख २९ हजार २१३ रुपयांचे उत्पन्न मिळाले. चालू आर्थिक वर्षात या विभागाने आतापर्यंत १ कोटी १७ लाख ६७ हजारांचा महसूल मिळवला आहे. या खेरीज शिवणकाम, वस्त्रोद्योगाच्या जोरावर कापड निर्मितीतही तुरुंग प्रशासानने मजल मारली आहे. या उद्योगातून गेल्या पाच वर्षांत तुरुंग प्रशासनाला ४ कोटी ११ लाख ७९ हजारांचा महसूल मिळाला आहे. नागपूरकरांच्या पसंतीस उतरलेल्या बेकरी विभागाने ५ वर्षांत वार्षिक १३ ते ३० लाखांपर्यंत व्यवसाय केला आहे. कार वॉशिंगसारख्या उपक्रमांतूनही कैद्यांनी दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळवला आहे.

असा मिळाला गेल्या ५ वर्षांत महसूल

वर्ष- एकूण महसूल
२०२१ – २०२२ – १ कोटी ५२ लाख २७ हजार ३७०
२०२२ – २०२३- ३ कोटी २५ लाख ४० हजार ५०९
२०२३ – २०२४- २ कोटी ६६ लाख ७७ हजार ३३४
२०२४ – २०२५- २ कोटी ९९ लाख ४७ हजार ३२८
२०२५ – २०२६- ४ कोटी ०७ लाख ६६ हजार ५१५

न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानांसाठी तुरुंग प्रशासन सुतार, लोहार, हातमाग, यंत्रमाग, धोबी, बेकरी, कार वॉशिंग आणि शिवणकामासारखे कौशल्यावर आधारीत उद्योगांचे प्रशिक्षण देते. जेणे करून बंदीवास संपल्यानंतर कारागृहातून बाहेर पडताना बंदिवानांना केवळ मोकळा श्वास घेण्या एवजी त्यांच्या हाताला कौशल्यावर आधारित काम मिळावे, ही त्यामगची भावना आहे. त्यामुळे नागपूर कारागृह एक ‘रोल मॉडेल’ ठरले आहे. -दिपा आगे, अतिरिक्त अधिक्षक, नागपूर मध्यवर्ती कारागृह