नागपूर : रुग्णालयात नियमित तपासणी केल्यानंतर घरी परतणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिली. त्यात दुचाकीच्या मागे बसलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे कारच्या धडकेने दुचाकीवरील ज्येष्ठ नागरिक पडल्याचे दिसत असतानाही चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत त्यांना चाकांखाली चिरडले. रामदासपेठ येथील सेंट्रल मॉल जवळील नागपूर सुधार प्रन्यास आयुक्तांच्या बंगल्यासमोर बुधवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास हा प्राणांतिक अपघात झाला. यातील संतापजनक बाब म्हणजे घटनेनंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

रामदास गणबाजी पाटील (७४) असे दगावलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. अजनी परिसरातील कुकडे लेआऊट येथील ते रहिवासी आहेत. रामदास हे महाराष्ट्र बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. मेंदूत झालेल्या गाठीवर उपचार घेण्यासाठी त्यांच्या पत्नी रामदास यांना नियमित शंकरनगरमधील एका रुग्णालयात नेतात. बुधवारी रामदास पाटील पत्नीसोबत दुचाकीने नियमित तपासणीसाठी दवाखान्यात गेले होते.

घरी परत जात असताना सेंट्रल मॉल समोरून दीक्षाभूमीच्या दिशेने वळताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या डस्टर कारने धडक दिली. यात गाडीचे संतुलन बिघडल्याने पाठीमागे बसलेले रामदास पाटील खाली पडले. त्याचवेळी डाव्या बाजूकडून कारची दोन्ही चाके त्यांच्या डोक्यावरून गेल्याने रामदास यांच्या डोक्याचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. त्यांच्या पत्नीला मात्र किरकोळ दुखापत झाली. माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांनी धाव घेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे कारचा शोध सुरू केला आहे. रामदास यांचा मुलगा हर्षल पाटील यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी हिट अँड रन आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

चार दिवसांतली तिसरी घटना

भरधाव वेगात कार चालवून वाहनधारकांना चिरडण्याची ही चार दिवसांमधील तिसरी हिट अँड रनची घटना आहे. रविवारी सकाळी जपानीज उद्यानाशेजारी पायी जात असलेल्या कैलास सौंधिया (७४) या ज्येष्ठ नागरिकाला कारने पाठीमागून धडक देत चिरडले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फरस उड्डाणपुलावर दुचाकीने निघालेला तरुण अमनकुमार लालचंद डहारे (२१) याला कारने धडक देत पळ काढला होता. त्यानंतर बुधवारी दुपारी सामदास पाटील यांचाही कारच्या धडकेत मृत्यू झाल्याने बेदरकार वाहनचालकांवर नियंत्रण कोणाचे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिसांच्या ११२ क्रमांवर नागरिकांचा संताप

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार घटना घडल्याच्या अगदी काही सेकंदात परिसरातील नागरिकांनी ११२ क्रमांकावरून माहिती कक्षाला सूचना देत मदत मागितली. मात्र पोलीस मदत आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास जवळजवळ पाऊण तासांचा कालावधी गेला. रक्ताच्या थारोळ्यात रामदास पाटील यांचा मृतदेह जागीच पडून असल्याने वाहतुकीचाही खोळंबा झाला. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.