नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील एका लोको पायलटने रेल्वे रुग्णालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली. दुपारच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वे वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके ?

लोको पायलटचे नाव सुधाकर चुनारकर (वय ५९) असे असून ते चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. काही दिवसांपूर्वी बाथरूममध्ये घसरून पडल्याने ते जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नागपूर येथील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते वॉर्ड क्रमांक ६ मध्ये उपचार घेत असल्याची माहिती आहे. शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांनी रुग्णालयातीलच खोलीत गळफास ही बाब लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाने तात्काळ धाव घेत त्यांना खाली उतरवले.

वरिष्ठ अधिका-यांची रूग्णालयात धाव

घटनेची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) तसेच इतर वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

दरम्यान, आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक कारणे, आरोग्याशी संबंधित तणाव किंवा इतर काही बाबी यामागे असू शकतात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. संबंधितांच्या जबाबांवरून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.