अमरावती : रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक प्रयत्न करूनही विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आळा घालण्यात यश मिळत नाहीये. वेळोवेळी तिकीट तपासनीस दंडात्मक कारवाई करताना दिसतात. पण, त्याचाही परिणाम या फुकट्या प्रवाशांवर होत नाही. अशातच एका तिकीट तपासनीसाने फुकट्या प्रवाशांकडून दंड वसुलीत विक्रम केला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवास करताना अनेकांना दहावेळा विचार करावा लागणार आहे. या तिकीट तपासनीसाच्या नजरेतून कुणीही फुकटा प्रवासी सुटला नाही. यामुळे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडूनही या तिकीट तपासनीसाचे कौतुक करण्यात येत आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य तिकीट तपासनीस आलोक कुमार झा यांनी एका दिवसात एक्स्प्रेसमधून तब्बल २२० विनातिकीट प्रवाशांना पकडून कारवाई करण्याचा विक्रम नोंदवला आहे. नागपूर येथील आलोक कुमार झा यांनी ही कामगिरी केली आहे. त्यांनी या फुकट्या प्रवाशांकडून सुमारे १ लाख ७२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे क्रमांक ०३२५१ दानापूर-एसएमव्हीटी बंगळुरू या एक्स्प्रेसमध्ये ही कारवाई केली आहे. ही एक्स्प्रेस दानापूर येथून सतना, जबलपूर, नागपूर, सेवाग्राम, विजयवाडा मार्गे बंगरूळू येथे पोहचते. या एक्स्प्रेसमध्ये तपासणी करताना त्यांना अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मध्य रेल्वेचे तिकीट तपासणी पथक सक्रिय झाले असून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे मध्य रेल्वेच्या तिजोरीत महसुलाची भर पडत आहे. तसेच विनातिकीट प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांची होणारी गैरसोय टळत आहे. मध्य रेल्वेने २०२४-२५ मध्ये एकूण ३८ लाख प्रकरणातून २०३.४१ कोटी रुपये महसूल मिळवला.
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आरक्षित डब्यांमधील अतिरिक्त टाळण्यासाठी जून २०२४ पासून एक धोरणात्मक बदल करण्यात आला आहे. लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इच्छितस्थळापर्यंत दंड आकारण्याऐवजी पुढील स्थानकापर्यंत दंड आकारला जात आहे. त्यानंतर पुढील स्थानकात त्यांना उतरवण्यात येत आहे. त्यामुळे आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास मिळत आहे. त्याचबरोबर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, सण-उत्सवाच्या काळात विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.