नागपूर : महिंद्रा ॲन्ड महिंद्रा कंपनी ईव्ही निर्मितीसह ऑटोमोबाईल क्षेत्रातील एकात्मिक (इंटिग्रेटेड) प्रकल्पासाठी १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार आज झाला. या प्रकल्पातून २०२८ पर्यंत वाहन उत्पादन सुरू करण्याचे नियोजन आहे. नागपूरसह छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथेही हे प्रकल्प उभारले जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नागपुरात आयोजित ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी मंचावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंकज भोयर, अॅड. आशिष जयस्वाल, पद्मश्री सत्यनारायण नुवाल, अदानी एअरपोर्ट्सचे संचालक जीत अदानी, महिंद्रा अॅन्ड महिंद्राचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन तसेच उद्योग व राजकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होते.

अॅडव्हान्टेज विदर्भ अंतर्गत अत्यंत महत्त्वाचे करार झाले असून, ऑटोमोबाईल क्षेत्रातील महिंद्रा अॅन्ड महिंद्राने ‘नेक्स्ट जनरेशन’ वाहनांच्या निर्मितीसाठी करार केला आहे. नागपूरमध्ये प्रस्तावित प्रकल्प हा एकात्मिक स्वरूपाचा असून, त्यामध्ये ईव्ही एसयूव्ही कार तसेच ट्रॅक्टरची निर्मिती केली जाणार आहे. नागपूरसह छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथे कंपनीकडून एकूण १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

गडचिरोलीला ‘ग्रीन स्टील हब ऑफ इंडिया’ करण्याचा निर्धार

नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर हा भाग देशाचा पोलाद हब होत आहे. भविष्यात गडचिरोलीपर्यंत नैसर्गिक वायू नेला जाईल. त्यातून तेथे ग्रीन पोलाद तयार केला जाईल. गडचिरोलीला ‘ग्रीन स्टील हब ऑफ इंडिया’ बनविण्यात येईल. गडचिरोलीत चीनपेक्षा स्वस्त पोलाद उपलब्ध होणार असून तो जगभरात पाठवला जाईल. आम्ही केवळ नागपूरकडेच लक्ष देतो, असा आरोप होतो.

परंतु नव्याने उद्योग मॅग्नेट विकसित करण्यात आले असून, त्यात कोकणातील रायगड, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि अमरावतीचा समावेश आहे. नागपूरमध्ये उद्योगासाठीची जमीन जवळपास संपली असून, आता विस्तार केला जाईल. सौरऊर्जा मॉडेलमध्ये देशातील सर्वांत मोठी इको-सिस्टीम नागपुरात उभी राहत असून, त्यातून सुमारे एक लाख रोजगारनिर्मिती होईल. तसेच आशियातील सर्वांत आधुनिक एव्हिएशन स्कूल अमरावतीत उभारले जात असून, येथे देश-विदेशासाठी वैमानिक घडवले जातील,” असेही फडणवीस म्हणाले.