नागपूर : पूर्वी उन्हाळ्यापुरताच मर्यादित असलेला कांजण्यांचा आजार आता नागपुरात थंडीच्या काळातही डोके वर काढत असल्याचे निरीक्षण नागपुरातील बालरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे. या आजाराचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत आहे. या आजाराबाबत बालरोग तज्ज्ञांनी नेमके काय निरीक्षण नोंदवले ? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपुरातील बालरोग तज्ज्ञांकडे उपचारासाठी येणाऱ्या शंभर रुग्णांपैकी किमान पाच मुलांना कांजण्याची लागण होत असल्याचे तपासणी अहवालातून दिसून आले. खासगी डाॅक्टरांसह शहरातील मेडिकल, मेयो, डागा या शासकीय रुग्णालयांतही कांजण्याचे रुग्ण वाढले आहेत. सध्या शहरात आढळणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश मुले पाच ते पंधरा वर्षे वयोगटातील आहेत. शाळा, वसतिगृहे आणि खेळाच्या मैदानांमधून हा संसर्ग वेगाने पसरण्याचा धोका असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अचानक ताप येणे, अंगावर लालसर पुरळ उठणे, त्यात पाणी भरणे व खाज सुटणे, अशक्तपणा, डोकेदुखी, तसेच काही रुग्णांमध्ये पुरळांमुळे जखमा होण्याचा धोका ही कांजण्यांची प्रमुख लक्षणे आहेत. वेळीच उपचार न केल्यास संसर्ग वाढून त्वचेचे गंभीर विकार, ताप वाढणे किंवा इतर गुंतागुंत निर्माण होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.
हा आजार टाळण्यासाठी कांजण्याची लक्षणे असलेल्या मुलांना इतर मुलांपासून वेगळे ठेवणे, शाळा व अंगणवाड्यांमध्ये संसर्गाची माहिती तात्काळ देणे, मुलांची स्वच्छता राखणे व हात धुण्याची सवय लावणे, पुरळांवर खाज येऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे न देणे, तसेच लसीकरण झाले आहे की नाही याची खात्री करणे गरजेचे असल्याचे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आजार बळावण्याचा धोका
थंडीच्या काळात मुले अधिक वेळ बंद खोल्यांमध्ये राहतात. शाळा, वसतिगृहे किंवा गर्दीच्या ठिकाणी संपर्कातून कांजण्याचा संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे ताप किंवा पुरळ दिसताच मुलांना शाळेत न पाठवता तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
तज्ज्ञ डाॅक्टर काय म्हणतात…
कांजण्यावर प्रभावी लस उपलब्ध आहे. वेळेवर लसीकरण केल्यास आजाराची तीव्रता कमी होते. रुग्णांची स्वच्छता राखणे, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या वस्तू वेगळ्या ठेवणे हे उपाय महत्त्वाचे आहेत. मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शासकीय रुग्णालयांत मोफत उपचार उपलब्ध आहेत. प्रतिबंधात्मक उपाय हाच कांजण्यासारख्या आजारांपासून बचावाचा प्रभावी मार्ग आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक व बालरोग तज्ज्ञ डाॅ. अविनाश गावंडे यांनी दिली.

