-रश्मी पदवाड मदनकर
शताब्दी चौकात दोनदोनच्या जोडीत त्या चौघी आळीपाळीने दिसत राहतात. पहिली जोडी १३-१४ वर्षाची आणि दुसऱ्या दोघी असाव्यात २२-२५ तल्या. विशेष म्हणजे चौघींजवळ चार बाळ आहेत.. अगदी छप्पर फाड के दिलंय बघा त्यांना देवाने. ही बाळं झोळीत निपचित पडलेली किंवा कडेवर रडत, पेंगत बसलेली, उन्हातान्हात, पावसात, धुळीत. दुसऱ्या १३-१४ वर्ष वयाच्या ज्या दोघी आहेत. त्या स्वतःच किशोरी असताना त्यांच्याजवळ प्रत्येकी एकेक चिमुकलं असतं. सिग्नल लागला की त्या पुढे येतात, काच ठोठावतात. तुम्ही ‘ये किसका बच्चा उठाकर घुमते हो’ असं विचारलं की त्या‘मेरा बच्चा है’ असं सांगतात आणि तुम्ही पुढला प्रश्न विचारण्याच्याआत निघून जातात. मग पुढले काही दिवस दिसत नाहीत…मग पुन्हा येतात. पुन्हा झोळीत बाळं; तीच का नवी…? माहिती नाही.

प्रश्र्न असा की प्रत्येकीकडे एक प्रमाणे असे किती चिमुकले असतात यांच्याकडे.. इतक्या ठोक भावाने कुठे

मिळतात मुले ? एका चौकात इतकी तर शहरात किती? आणि राज्यात? देशात? ही मुले जरा मोठी
झाली की काय होतं यांचं? कुठे जातात ही? यात मुली असतील तर त्यांचं काय होतं…? यांचं भविष्य काय ? दिवसा

सिग्नलवर दिसणाऱ्या या वेदना… तर रात्रीच्या अंधारात काय होत असेल ?
उत्तरं नाहीत, वाली नाही, तक्रार नाही, पुरावा नाही.
पण म्हणून प्रश्न थांबत नाहीत. त्या बाळांचे मिटलेले डोळे, उन्हाने काळवंडलेली गालं आणि स्वतःचं बालपण
हरवलेल्या त्या मुली; हे सगळं मनात ठसत राहतं. आपल्याला फारसं काही करता येत नाही. आपण

गाडीत बसतो व पुढे निघून जातो. पण निदान प्रश्न विचारता येतात. अस्वस्थता शब्दात मांडता येते. कारण कधी कधी बदलाची सुरुवात उत्तरांपासून होत नाही; ती अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांपासूनच होते; आणि म्हणूनच हा प्रपंच. ही तळमळ. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न.
एखाद्या दिवशी मन खूप उद्विग्न करणारं काहीतरी नजरेत पडतं आणि सगळंच कसं फोल वाटायला लागतं.

काही महिन्यांआधीची गोष्ट असेल; रोज ऑफिसला जाण्याच्या वाटेत व्हेरायटी चौक चौक लागतो. चौकाच्याच बाजूला पोलिस स्टेशनही आहे. ५-६ वर्षाच्या मुलीचा खांद्यापासून ढोपरापर्यंत कट झालेला हात दाखवत बाराएक वर्षांचा मुलगा पुढे आला, हिला औषधीला पैसे द्या म्हणाला. रक्ताळलेला पूर्ण फाटून फाकलेला हात बघून फार कसनुसं झालं. हातात येईल ती शंभरेक रुपयांची नोट त्या पोराच्या हातात ठेवली आणि सिग्नल सुटताच निघून गेले. त्या दिवसभर तो लाल-लाल हात नजरेसमोर दिसत राहिला. काय झालं असेल… का झालं असेल? अनेक तर्कवितर्क मनातच रंगत राहिले. पण झाला असेल अपघात काहीतरी म्हणून मग संध्याकाळपर्यंत सगळं विस्मरणात गेलं. झाला गेला दिवस निवळला. त्यानंतरच्या चौथ्या दिवशी पुन्हा ५ वर्षांच्या

मुलीचा पूर्णतः भाजलेला हात पुढे करत ८-९ वर्षांचा वेगळाच एक मुलगा पुढे आला. त्या चिमुकलीचा हात इतका भाजला होता जणू उकळत्या तेलात तळून काढलाय. जीव कळवळला, भोवळ यायची बाकी राहिली. त्या पोराला बोलले, चल दवाखान्यात जाऊ. हिच्यावर उपचार करू, तर “ पैसे दो, नहीं तो जाओ” म्हणत रस्ता ओलांडून तो निघून गेला. मी पाहतच राहिले. राहवले नाही म्हणून लगेच वळवून सरळ गाडी पोलिस स्टेशनात घेतली. रीतसर तक्रार नोंदवली… दिवसभर मन लागलं नाही. इतक्या चिमुकल्या मुलींसोबत काय होतंय, हे इतकं बाहेर दिसतंय तर एकट्यात आत काय होत असेल ? विचार करून डोक्याचा भुगा. आत खूप गहिवरून येत होतं, चलबिचल होत राहिली. स्वतःच राग आला. बाहेर हे सगळं असं काय चाललंय आणि आपण काय करतोय? आभासी जगात दाखवल्या जाणाऱ्या कित्येक गुडी गुडी गोष्टींना सत्य मानून आनंदात जगतोय. डोळे झाकल्याने सत्य बदलणार आहे का? डोळ्यावरची झापडं काढायला हवीय…

तर मी तक्रार नोंदवल्यानंतर ऑफिसला जाता येता या चौकात आवर्जून लक्ष देणं सुरु होतं… पूर्ण १२ दिवस लहान मुलं तर सोडा साधे दुसरे भिकारीही दिसले नाहीत. वाटलं, चला आपल्या तक्रारीने काहीतरी सकारात्मक फरक पडला असावा, चिमुकल्यांना पोलिसांनी या दुष्टचक्रातून बाहेर काढले असावे…पण तसे नव्हते. एका सकाळी पुन्हा अगदी 5-6 वर्षांची नवी पोर हात पूर्ण लदलद जळालेल्या अवस्थेत पुढ्यात आली. पोलिस स्टेशनला जाऊन मी पुन्हा जरा आठवण देऊन आले… त्याचा उपयोग पुन्हा ४ दिवस होईलही, पण अश्या किती चिमुकल्या नरकयातना भोगत राहणार आहेत, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. मी एकटीने तरी काय करावे? हवे तसे उत्तर सापडतच नाही.

नागपुरातील अनेक सिग्नल्सवर, रेल्वे स्थानकांवर, मंदिरात, लहान-मोठा ताजबाग अशा कित्येक ठिकाणी लहान मुले भीक मागताना आढळतात. ऊन-पाऊस-गारवा कुठल्याही वातावरणात उघडे-नागडे, उपाशी-तापाशी, पिंजारलेले केस, जखमा-जखमा झालेलं अंग… वेदनेने-दुःखाने पिचलेले किंवा मग त्यापलिकडे गेलेले. कुणाचे आहेत, कुठून आले, कुठे गेले ह्याचा कुणाला थांग पत्ता नसतो. त्यातील बरीच मुले ही माफिया लोकांनी गरीब वस्तीतून भीक मागण्यासाठी अपहरण केलेली किंवा परराज्यातून पळवून आणलेली असतात. या मुलांच्या संरक्षण आणि उत्तम नागरिक बनण्याच्या हक्काबद्दल सरकार, प्रशासन काही करणार आहे का? की, रस्त्यावरच्या मोकाट श्वानांसारखी यांच्या आयुष्याला काहीच किंमत नाही? कित्येक आई-वडील याच रस्त्याने रात्रंदिवस प्रवास करीत असतील. यांच्या कुणाच्याच मनाला हे सारे प्रसंग कधीच खटकत नसतील का? आम्ही कोडग्या मनांनी, उघड्या डोळ्यांनी हा तमाशा पाहत राहणार आहोत… पाहतो आहोत. आमच्या संवेदना न मरो हीच प्रार्थना…!

अनेक वेळा सिग्नलवर दिसणाऱ्या, भीक मागणाऱ्या बालकांमागे केवळ दारिद्र्य नसून एक संघटित साखळी कार्यरत असल्याची चर्चा ऐकायला मिळते. काही प्रकरणांत मुलांना पळवून आणणे, त्यांना जाणीवपूर्वक असुरक्षित परिस्थितीत ठेवणे किंवा त्यांच्याकडून भीक मागवून आर्थिक फायदा मिळवणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे उघडकीस आलेले आहेत. भीक मागण्यासाठी लहान मुलांना जाणीवपूर्वक इजा करणे किंवा त्यांना मारणे हा केवळ गुन्हा नाही, तर मानवतेलाच काळीमा फासणारा प्रकार आहे. भारतात अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाते. ही बाब केवळ कायद्याचा प्रश्न नाही; ती मानवी हक्कांची पायमल्ली आहे.याला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा, प्रशासन आणि बालकल्याण संस्था यांनी समन्वयाने आणि ठोस कारवाई करणे अत्यावश्यक आहे. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती आणि नागरिकांची सतर्कता यामुळे अशा गुन्हेगारी साखळ्या मोडून काढणे शक्य आहे. प्रत्येक मुलाला सुरक्षित बालपण मिळणे हा केवळ सामाजिक नव्हे, तर नैतिक कर्तव्याचा विषय आहे.

काय करता येईल?

  • संशयास्पद घटना त्वरित पोलिस किंवा बालकल्याण समितीकडे कळवा.
  • ‘चाईल्ड हेल्पलाईन १०९८’ वर संपर्क साधा.
  • भीक देण्याऐवजी पुनर्वसन संस्थांना पाठिंबा द्या.
  • सजग नागरिक बना; दुर्लक्ष करू नका.
  • प्रशासन-पोलिस-संस्था यांनी संयुक्त कारवाई मजबूत करावी.
    संवेदनशीलतेला कृतीची जोड देऊया. कारण प्रत्येक मूल भीक नव्हे, तर सुरक्षित, सन्मान्य आणि यशस्वी आयुष्याचा अधिकारी आहे. ते देण्यात आपण अपयशी ठरलो, तर ते केवळ व्यवस्थेचा नव्हे, तर समाज म्हणून आपल्या सामूहिक विवेकाचा पराभव ठरेल. एक पिढी सिग्नलच्या लाल दिव्यात अडकून राहू नये, एका पिढीचे बालपण हातात झोळी घेऊन रस्त्यावर हरवू नये, गुन्हेगारीकडे वळू नये; यासाठी आपण शांत राहू नये. नाहीतर उद्या इतिहास विचारेल “तुम्ही पाहत होतात… पण तुम्ही केलं काय?”

-रश्मी पदवाड मदनकर

rashmi.aum15@gmail.com