नागपूर: मुळातच अरूंद असलेला मुख्य मार्गाला जोडणारा रस्ता कंत्राटदाराने खोदकाम करून बंद केल्याने चिंचभवनमधील नागरिक संतापले आहेत. विशेषतः शाळकरी विद्यार्थी आणि चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. दक्षिण- पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. याच मतदारसंघात चिंचभवनवस्ती येते. या भागात चारही नगरसेवक भाजपचे आहेत. पण नागरी सोयींबद्दल वस्तीची हालत बकाल स्वरूपाची आहे.
वस्तीतील महावितरणच्या कार्यालयाकडे जाणा-या रस्त्यावर कंत्राटदारांने खड्डा खोदला, त्यामुळे वस्तीतून मुख्य रस्त्यावर जाताच येत नाही. अत्यंत संथपणे काम सुरू आहे. काही दिवस काम बंद होते. रस्ता बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याची खंत खेद कंत्राटदारांला नसल्याने लोकांमध्ये संताप वाढला आहे. झटपट काम पूर्ण करून रस्ता पूर्ववत करण्याऐवजी कामच बंद ठेवून लोकांना वेठीस धरले जात आहे.
कंत्राटदारांने रविवारी आपल्या मर्जीने पर्यायी रस्ता बंद केला. त्याची मनमानी वाढतच चालली असून नागरिकांच्या गैरसोय कडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. नगरसेवक या भागाकडे ढूंकूनही बघत नाही.
