नागपूर महापालिकेकडून पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात गेलेल्या उद्यानांची विकास कामे ठप्प झाली आहेत. नागपूर सुधार प्रन्यासने अंबाझरी उद्यानाची ४४ एकर जमीन उद्यानासाठी असल्याने तेथे बांधकाम करण्याच्या प्रस्ताव नाकारला आहे. या निर्णयाच्या विरोधात कंत्राटदार कंपनीने राज्य सरकारकडे सुधारित प्रस्ताव सादर केला आहे. दरम्यान, गेल्यावर्षीपासून विकास कामांच्या नावाखाली नागरिकांसाठी हे उद्यान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना फिरायला जाता येत नाही.

ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा करण्याचे ठिकाण उरले नाही. त्यामुळे जोपर्यंत येथे विकासकामे सुरू होत नाहीत, तोपर्यंत उद्यान खुले करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पर्यटन विकास महामंडळाला उद्यान व काही जागा भाडेपट्टीवर दिली असली तरी स्थानिकांचा उद्यानात फिरण्याचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असेही येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

महसूल व वन खात्याने अंबाझरी उद्यान व त्यालगतची ४४ एकर जमीन महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाला पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी दिली आहे. यासंदर्भात जुलै २०१७ राज्य सरकारने आदेश काढले. त्यानंतर एमटीडीसीने हे उद्यान व जमीन विकसित करण्याचे कंत्राट गरुडा ॲम्युझमेंट नागपूर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिले. विकास प्राधिकरण नासुप्रने कंत्राटार कंपनीचा विकास आराखडा नाकारला आहे. ही जमीन उद्यानासाठी राखीव असल्याने या ठिकाणी बांधकामास नासुप्रने मज्जाव केला आहे.

कंत्राटदार कंपनीवर आरोप –

“गरुडा कंपनीने अंबाझरी उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेशन सेंटर एनआयटीच्या परवानगीशिवाय पाडले, असा आरोप आहे. या उद्यानातील झाडेही कापली गेली. येथे आग लावण्यात आली. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.”, असे आमदार विकास ठाकरे म्हणाले.

नागपुर सुधारणा प्रन्यासचा प्रस्ताव शासनाने फेटाळला –

अंबाझरी उद्यान नागपुर सुधारणा प्रन्यासकडे द्यावे. तेथे पर्यटन केंद्र विकसित करू, असा प्रस्ताव सुधार प्रन्यासने राज्य शासनाकडे पाठवला होता. परंतु शासनाने तो फेटाळला आहे.