नागपूर : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी झालेल्या फ्लॅश फ्लडच्या पार्श्वभूमीवर काठमांडू येथे अडकलेले नागपूर जिल्ह्यातील नागरिक परतीच्या वाटेवर आहेत. श्री. स्वामी महाराज यांच्या समूहासोबत पर्यटन व धार्मिक भेटीसाठी नेपाळला गेलेल्या सुमारे १०६ नागरिकांपैकी १०२ जण रविवार, ३० ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजता ते नागपुरात दाखल होतील.
नागपूर जिल्ह्यातील या नागरिकांचा समूह २२ ऑगस्ट रोजी काठमांडू येथे गेला होता. या समूहात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, २६ ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये फ्लॅश फ्लडची घटना घडली. मात्र, या नैसर्गिक आपत्तीचा समूहातील नागरिकांवर कोणताही प्रतिकूल परिणाम झाला नसून सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली.
काठमांडू येथील माहेश्वरी समाज भवन येथे या नागरिकांची सुरक्षित व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला असून, त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेबाबत नियमित माहिती घेतली जात होती. नेपाळ प्रशासनानेही आवश्यक मदत व सहकार्य केले.
दरम्यान, परतीच्या प्रवासासाठी नियोजित बससेवा उपलब्ध न झाल्याने नेपाळ प्रशासनाने पर्यायी बसेसची व्यवस्था केली. त्यानुसार नागरिकांना २७ ऑगस्ट रोजी काठमांडूहून जनकपूर आणि त्यानंतर नेपाळ-भारत सीमेच्या दिशेने रवाना करण्यात आले. यानंतर पुढील प्रवास रेल्वेने करण्यात आला असून, १०२ नागरिक नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांचे नागपुरात आगमन होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षित परतीमुळे त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
चार जण विमानाने
चार विमानाने नागपुरला रावाना झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तर १०२ जण रेल्वेने नागपूरला येणार आहे.
सुनील सुभेदार मुंबईत मुलाकडे
एमएसईबीचे निवृत्त अधिकारी सुनील सभेदार हे नागपुरातील गिरीपेठ भागातील रहिवासी असून गेल्या काही वर्षापासून मुलाकडे मुंबईत वास्तव्यास आहेत. ते ही कैलास मानसरोवर येथे यात्रेसाठी गेले होते. त्यांच्यासोबत १६० जण असल्याचे सांगण्यात येते. त्यांचाही संपर्क प्रशासनाशी होवू शकला नाही.
