नागपूर : नागपूर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुरू झालेल्या निवड प्रक्रियेत पक्षासमोर प्रभावी, आक्रमक आणि संघटनात्मकदृष्ट्या सक्षम नेतृत्व निवडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. विशेषतः भाजपशी थेट वा अप्रत्यक्ष संबंध नसलेला आणि पक्षाची भूमिका ठामपणे मांडणारा नेता निवडण्याची मागणी पुढे येत आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेले निरीक्षक अरुण यादव तसेच प्रदेश निरीक्षक माणिकराव ठाकरे, अशोक बोबडे आणि जिया पटेल यांनी आजपासून नागपुरात भेटीगाठी आणि बैठका सुरू केल्या आहेत. आगामी काही दिवसांत हे निरीक्षक विविध गटांशी संवाद साधून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.
भाजपची नागपुरातील मजबूत संघटनात्मक पकड लक्षात घेता काँग्रेससमोर केवळ संघटन नव्हे तर वैचारिक पातळीवरही प्रभावी नेतृत्व उभे करण्याची गरज असल्याची पक्षांतर्गत चर्चा आहे. त्यामुळे बूथ स्तरापर्यंत संघटन मजबूत करणारा, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा आणि विरोधकांबाबत आक्रमक भूमिका घेणारा अध्यक्ष निवडण्यावर भर दिला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, स्थानिक पातळीवर काही काँग्रेस नेते भाजपशी जवळीक साधून असल्याचा आरोप आहे. तसेच काही नेत्यांवर भाजपसमोर मवाळ भूमिका घेतल्याची टीका होत असून, त्याचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर झाल्याचे निरीक्षण राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमीवर नव्या अध्यक्षांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात आक्रमक भूमिका घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व संघटन बळकटीकरणावर भर देत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेनुसार स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्व उभे करणे हेही या प्रक्रियेचे प्रमुख उद्दिष्ट मानले जात आहे.
शहराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुकांनी दावेदारी सादर केली असून, पक्षांतर्गत गटबाजी आणि समतोल साधण्याचे आव्हान निरीक्षकांसमोर आहे. काही अनुभवी नेते तसेच नव्या चेहऱ्यांची नावे चर्चेत असून अंतिम निर्णय काँग्रेस श्रेष्ठी घेणार आहेत. निरीक्षकांच्या बैठका व मुलाखतींनंतर तयार होणारा अहवाल दिल्लीतील नेतृत्वाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर नागपूर शहर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाबाबत अंतिम निर्णय जाहीर होईल. आगामी स्थानिक राजकीय समीकरणांवर या निवडीचा महत्त्वपूर्ण परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे.
