नागपूर : शहरातील मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राणी आढळण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच न्यू वसुंधरा हाउसिंग सोसायटीतील प्लॉट क्रमांक ७३ येथे शनिवारी (८ ऑगस्ट) सिव्हेट कॅट आढळून आली. अचानक वन्यप्राणी आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ उत्सुकता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी याची माहिती दिल्यानंतर वन्यजीव बचावकर्ता संतोष सोनी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आदित्य ऐनवाती आणि कार्तिक मेश्राम यांच्या मदतीने सिव्हेट कॅटला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले.

अनुचित घटना टळली

बचावकार्यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरल्यास नागरिकांनी त्याला घेरण्याचा, पकडण्याचा किंवा हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. गर्दी केल्याने वन्यप्राणी घाबरून आक्रमक होण्याची किंवा स्वतःला इजा करून घेण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वेळी नागरिकांनी सुरक्षित अंतर राखून तातडीने प्रशिक्षित वन्यजीव बचावकर्ता किंवा वन विभागाला माहिती देणे आवश्यक आहे.

वस्त्यांमध्ये वन्यजीवांचा वावर

नागपूर शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना शहरालगतच्या नैसर्गिक अधिवासांशी मानवी वस्तीचा संपर्क वाढत आहे. त्यामुळे साप, माकड, रानडुक्कर, बिबट्या यांसह विविध वन्यजीव मानवी वस्त्यांमध्ये आढळण्याच्या घटना अधूनमधून समोर येत आहेत. अन्न, पाणी किंवा आसऱ्याच्या शोधात काही वन्यजीव नागरी भागात येतात. विशेषतः शहरालगतच्या भागांमध्ये अशा घटनांचे प्रमाण अधिक जाणवते. वन्यजीव शहरात आल्यास त्याला धोका निर्माण होण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा घटनांकडे केवळ कुतूहल म्हणून न पाहता वन्यजीव आणि नागरिक या दोघांचीही सुरक्षितता लक्षात घेऊन योग्य पद्धतीने हाताळणे गरजेचे आहे.

या प्राण्यांविषयी समज की गैरसमज

मसण्याऊद हा प्राणी मांसाहारी असून रंगाने काळा असतो त्याच्या पायाला मजबूत असे नखे असतात. समोरच्या दोन पायाच्या नखानी तो माती उकरतो व मागच्या दोन पायांनी माती बाहेर फेकतो माणसाचा मृतदेह जर एखाद्या ठिकाणी गाडला असेल तर त्याला पूर्णपणे उकरण्याची ताकत या मसण्याऊदामध्ये असल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे ज्या ठिकाणी मनुष्याचा मृतदेह गाडला जातो त्या ठिकाणी प्रामुख्याने हा प्राणी आढळतो.

‘सिव्हेट कॅट’ परीसंस्थेत महत्वाची

सिव्हेट कॅट हा परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे वन्यजीव आढळल्यास नागरिकांनी त्याला इजा न करता संबंधित यंत्रणांना माहिती देणे आणि बचावकार्याला सहकार्य करणे, हेच त्याच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरते.