नागपूर : शहरासह ग्रामीण भागात सिमेंट रस्त्याचे जाळे तयार करण्यात येत आहे.परंतु या सिमेंट रस्त्यामुळे वस्त्यांचे गणित बिघडत आहे. सिमेंट रस्ते उंच झाले असून घर खाली गेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी घरात शिरण्याची भीती आहे. यावर उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. परंतु त्यानंतरही हे सिमेंट रस्ते उंच करण्यात येत आहे.काही ठिकाणी तर विद्यमान पदपथापेक्षा हे सिमेंट रस्ते उंच करण्यात येत आहे. तर अधिकाऱ्यांकडून त्याला योग्य ठरविण्यात येत आहे.
सिव्हिल लाईन येथील राणी कोठी चौक ते नागपूर ग्रामीण तहसील कार्यालय चौकपर्यंतचा रस्ता सिमेंटचा करण्यात येत आहे. तो पदपथापेक्षा उंच झाला आहे. रस्ता तयार करताना पूर्वीच्या डांबरी रस्त्याचे खोदकाम योग्यरित्या करण्यात आले नाही,असा आरोप केला जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय ते नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयपर्यंतचा रस्ता सिमेंटचा करण्यात येत आहे.
त्याला स्थानिकांनी विरोध केला होता. त्यामुळे काम थांबले होते. परंतु त्यानंतर त्याचे काम सुरू झाले. शिक्षण मंडळ कार्यालय ते राणी कोठी चौकपर्यंतच्या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर राणी कोठी ते नागपूर ग्रामीण तहसील कार्यालय चौकपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. या रस्त्याची उंची पदपथापेक्षा अधिक असून मूळ डांबरी रस्त्याच्या तुलनेत सिमेंट रस्ता उंच झाला आहे. तो तयार करताना पूर्वीचा डांबर रस्ता खोदावा लागतो. परंतु कंत्राटदाराकडून त्याकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्याची उंची वाढली आहे. यावर न्यायालयाने सुद्धा चिंता व्यक्त केली आहे.
रस्तबांधणी दरम्यान कॉंक्रिटच्या मिश्रणाचीही तपासणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. सिव्हिल लाईन सारख्या भागात रस्त्याची गुणवत्ता राखली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत राऊलकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रतिसाद दिला नाही.
“ सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येत आहे. या रस्त्याच्या डिझाईनला व्हीएनआयटीने मान्यता दिली असून तांत्रिकदृष्ट्या खोदकाम योग्य आहे.”-अविनाश गुल्हाने, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

