नागपूर : दोन्ही पायांनी दिव्यांग असतानाही स्वतःच्या हिमतीवर जगण्याची जिद्द बाळगणाऱ्या हरिदास बिरादार याला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वावलंबनाचा आधार दिला आहे. रोजगाराच्या शोधात हैदराबादहून नागपुरात आलेल्या हरिदासला दिव्यांगत्वामुळे काम मिळत नव्हते. त्यामुळे रेल्वे क्लब चौकात एका सहकाऱ्यासोबत मदतीच्या प्रतीक्षेत दिवस काढण्याची वेळ त्याच्यावर आली होती. त्याची ही परिस्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत त्याला नवी कोरी स्कुटी भेट दिली. त्यामुळे आता हरिदासला डिलिव्हरी बॉय म्हणून काम करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळणार आहे.

हरिदासचे वय अवघे ३४ वर्षे असून, त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील ऑटो चालवतात, तर आई दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी आणि घरकाम करून कुटुंबाला हातभार लावते. कुटुंबावर आर्थिक भार न बनता स्वतःच्या कष्टाने कमाई करण्याच्या उद्देशाने हरिदास रोजगाराच्या शोधात नागपुरात आला. मात्र, दोन्ही पायांनी दिव्यांग असल्याने त्याला काम मिळविण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर लोकांच्या मदतीवर गुजराण करण्याची वेळ त्याच्यावर आली.

जिल्हाधिकाऱ्यांची पडली नजर

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद विविध कामानिमित्त रेल्वे क्लब चौकातून जात असताना हरिदास अनेकदा त्यांच्या नजरेस पडला होता. एका दिवशी त्यांनी आपली गाडी थांबवून हरिदासची आस्थेने चौकशी केली. त्याच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी हरिदासने केवळ आर्थिक मदतीची अपेक्षा नसून स्वतःच्या कष्टाने कमावण्याची इच्छा असल्याचे सांगितले. एका सहकाऱ्याच्या मदतीने डिलिव्हरी बॉयचे काम करण्याची त्याची तयारी होती. मात्र, त्यासाठी दुचाकीची आवश्यकता होती.

हरिदासची स्वावलंबी होण्याची जिद्द लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मदतीचे आश्वासन दिले. त्यानुसार बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून त्याला नवीन स्कुटीच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

स्वावलंबनाच्या दिशेने पहिले पाऊल

स्कुटी मिळाल्याने हरिदासच्या रोजगाराचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘आता स्वतःच्या हिमतीवर काम करून जगता येईल. कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही,’ अशा भावना त्याने व्यक्त केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ आर्थिक मदत न करता त्याला रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले. त्यांच्या या संवेदनशील पुढाकारामुळे एका दिव्यांग तरुणाला स्वाभिमानाने जगण्याची नवी उमेद मिळाली आहे.