नागपूर: केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होणे ही काही साधी गोष्ट नाही. तेही एका घरातील दोन व्यक्ती थेट यूपीएससी उत्तीर्ण होण्याची उदारणे क्वचितच दिसतात.

नागपूरचे नवीन जिल्हाधिकारी हे याचे एक उदाहरण आहे. वडिल शेतकरी. त्यांना शेतीच्या एका कामासाठी वारंवार प्रशासकीय कार्यालयामध्ये जावे लागत होते. शेवटी त्यांची भेट एका जिल्हाधिकाऱ्यांशी झाली. आणि त्यांनी एका दिवसात काम केले. येथूनच सुरू झाला जिल्हाधिकारी बनण्याचा प्रवास. कुमार आशीर्वाद हे नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांचा प्रवास बघूया.

वडिलांच्या अश्रूमध्येच एका मुलाचे स्वप्न जन्माला

काही कथा यशाच्या नसतात, त्या संवेदनांच्या असतात… आणि अशाच एका भावनिक क्षणातून ज्यांची प्रेरणादायी वाटचाल घडली आहे ते कुमार आशीर्वाद हे नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. झारखंडमधील गोपालगंजमध्ये वास्तव्यास असलेले कुमार. घरची साधी परिस्थिती. एका शेतीच्या कामासाठी त्यांचे वडील प्रशासनाच्या दारात वारंवार जात होते. प्रत्येक दार ठोठावत होते… पण प्रतिसाद मात्र मिळत नव्हता. अधिकाऱ्यांच्या दारात उभं राहून, आशेने परतणाऱ्या वडिलांची तगमग त्या लहान मुलाच्या डोळ्यांसमोर दररोज उभी राहत होती. शेवटी कुणाच्या तरी सल्ल्याने वडील थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. एक भेट…. एक संवाद… आणि संपूर्ण चित्र बदलले ! जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ अर्जाची दखल घेतली, संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि काम मार्गी लावले. घरी परतताना वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते…. आणि त्या अश्रूमध्येच एका मुलाचे स्वप्न जन्माला आले.

या उपक्रमाची दखल केंद्र सरकारपर्यंत

‘जे कुणालाही जमत नाही, ते जिल्हाधिकारी करू शकतात…’ ही जाणीव कुमार यांच्या मनात इतकी खोलवर रुजली की, त्याच क्षणी त्यांनी ठरवलं ‘मलाही कलेक्टर व्हायचं!’ २०१६ बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले कुमार आशीर्वाद यांनी आयआयटी खरगपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना प्रशासनाचा मानवी चेहरा दाखवला. प्रशासनातील कणखर निर्णय घेतानाही त्यांनी माणुसकीचा धागा कधी सोडला नाही, गडचिरोलीत त्यांनी अपंग व निराधारांसाठी घरपोच सेवा सुरू केली. अपंग दाखले, आधार कार्ड, रेशन कार्ड थेट घरी पोहोचवण्याची योजना. त्यांच्या या उपक्रमाची दखल केंद्र सरकारपर्यंत पोहोचली.

अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण

सोलापुरात महापुराच्या वेळी ते लोकांच्या दुःखात सहभागी झाले. चार-पाच दिवस त्यांनी पूरग्रस्तांमध्ये राहून त्यांच्या जखमा समजून घेतल्या. तातडीची मदत, नियोजनबद्ध उपाययोजना आणि संवेदनशील निर्णय यामुळे त्या संकटात एकाही जिवाची हानी झाली नाही. कुमार आशीर्वाद यांची कहाणी ही केवळ एका अधिकाऱ्याची नाही, तर एका मुलाच्या मनात रुजलेल्या भावनेची आहे… वडिलांच्या डोळ्यांतून ओघळलेल्या अश्रृंनी जे स्वप्न पेरले, ते आज अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण बनून उभे आहे.