नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा गृह जिल्हा असलेल्या नागपूरला नवीन जिल्हाधिकारी मिळालेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोमवारी मावळते जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचा उल्लेख केला. गडचिरोलीत काम करणे सर्वात अविस्मरणीय असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सोलापूरमध्ये ही काम करण्यात वेगळा आनंद आला. नागपूर आणि सोलापूरची भौगोलिक स्थिती वेगळी आहे. त्यामुळे येथील प्रश्न, विषय समजून कामाला प्राधान्य देण्यात येईल. गडचिरोलीत मुख्य कार्यकारी अधिकारी असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे त्यावेळी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री होते. त्यांनीच सोलापूर येथे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती दिली. आता त्यांच्याच आशीर्वादामुळे नागपूरचे जिल्हाधिकारी पद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, गेली तीन वषें सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम केले. पाणीटंचाई, दुष्काळसदृश्य परिस्थीती, धामिंक स्थळांचा जिल्हा, दक्षिणेची काशी व संवेदनशील अशा या भागात काम केले. तेथील भौगोलिक परिस्थीती व नागपूरची वेगळी आहे. महिनाभर संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास करून, कामाची दिशा ठरविली जाईल, असे आशीर्वाद म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बावनकुळे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा गृह जिल्हा आहे. येथील लोकप्रतिनिधींशी ओळख, त्यांच्या मतदारसंघातील अडचणी समजून घेणार. मुख्यमंत्र्यांचे प्राधान्यक्रम असतील त्या नुसार काम करेल. यापूर्वी काम केलेल्या जिल्ह्यातील नागरिकांचे सहकार्य मिळाले.

कुमार आशीर्वाद यांनी गडचिरोली जिल्ह्यात काम करताना दिव्यांग, कुपोषण व इतर योजनांची आठवण करून दिली. सोलापूरमध्येही पाणीटंचाई व पुरपरिस्थीतीच्या कामास प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. तुलनेत नागपूर मोठा जिल्हा आहे. येथील भौगोलिक परिस्थीती व सामाजिक संरचनाही वेगळी आहे. त्यामुळे अभ्यास करून, प्राधान्यक्रमानुसार कामास गती देण्यात येईल, असे ते म्हणाले.

लहान भाऊ आयपीएस

कुमार आशीर्वाद यांचे वडील सरकारी कर्मचारी असून ते निवृत्त झालेत. कुमार आशीर्वाद हे मुळचे झारखंड राज्यातील आहेत. २०१७ मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. गेल्या २५ वर्षांपासून त्यांचे कुटुंब जमशेदपूर येथे स्थायिक झाले आहेत. बहिणीने सिम्बॉयसीसमधून कायद्याची पदवी घेतली असून, ती जमशेदपूर येथे वकिली करीत आहे. त्यांचे पतीही सनदी अधिकारी आहे. तर, लहान भाऊ भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) आहे. सध्या तो जमशेदपूर येथे कार्यरत आहे.

गडचिरोली मागितले होते, सोलापूरही चांगलेच

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली नेमणूक सिंधुदुर्ग येथे झाली. नंतर नाशिक येथे परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांनी तेव्हाच्या नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार व स्वत:च्या इच्छेनुसार नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नेमणूक मागितली होती. गडचिरोलीत काम करतांना आनंद झाला. सोलापुरात काम करताना अनेक आव्हाने स्वीकारावी लागली. हे दोन्ही जिल्हे मनातून जाणार नाहीत, असा उल्लेख करीत त्यांनी नागपूरबाबतही असे घडण्यासाठी कामास सुरुवात करीत असल्याची अपेक्षा व्यक्त केली.