पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) १७ जुलैला नागपूरसह देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ‘नीट’ परीक्षा घेतली. नागपुरातील एका केंद्रावर गोंधळ झाल्याची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

परीक्षा खोलीमधील घड्याळ्यात बिघाड झाल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या वेळेचे नियोजन चुकले. अनेकांना उत्तरपत्रिकेमध्ये खुणा करता आल्या नाहीत, असा दावा या तक्रारीत करण्यात आला.

कामठी रोडवरील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये परीक्षा केंद्र होते. दुपारी २ ते ५.२० ही वेळ पेपरची होती. नियोजित वेळेवर परीक्षा सुरू झाली. खोलीतील घड्याळात तांत्रिक दोष होता. विद्यार्थ्यांनी पेपर लिहायला सुरुवात केली. पण काही वेळातच घड्याळाचा वेग मंदावला. ती वास्तविक वेळेपेक्षा मागे होती. भिंतीवरील घड्याळात ५ वाजले होते. त्यामुळे अजून २० मिनिटे शिल्लक आहेत असा विचार विद्यार्थी करत राहिले. मात्र, तेव्हाच परीक्षा खोलीमधील घड्याळ मागे असल्याचे निरिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिका घेण्यास सुरुवात केली. पण त्यात गडबड होती.

घड्याळ्याच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली –

मुळात, ‘नीट’चे बरेच विद्यार्थी प्रथम पेपरमधील वेळेच्या व्यवस्थापनासाठी संपूर्ण पेपर सोडवतात आणि नंतर शेवटच्या काही मिनिटांत त्यांची उत्तरपत्रिका म्हणजे ‘ओएमआर शीट’वर चिन्हांकित करतात. घड्याळ्याच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. एका विद्यार्थिनीने संपूर्ण पेपर सोडवला होता आणि ओएमआर शीट भरण्यासाठी शेवटची २० मिनिटे ठेवली होती. पण घड्याळातील बिघाडामुळे तिला संपूर्ण उत्तरे दुरुस्त करता आली नाही. विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, तिला फक्त जीवशास्त्राचा भागाची उत्तरे चिन्हांकित करता आली. त्यामुळे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या उत्तऱ्यांच्या खुणा करता न आल्याने विद्यार्थिनीचे नुकसान झाले आहे.

तो विद्यार्थ्यांचा दोष कसा? –

विशेष म्हणजे, नीट परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना स्वत:चे घड्याळ नेता येत नाही. त्यामुळे परीक्षा खोलीमध्ये असलेल्या घड्याळाला बघूनच विद्यार्थी परीक्षेचे नियोजन करतात. असे असताना परीक्षा खोलीतील घड्याळ बिघडल्यास तो विद्यार्थ्यांचा दोष कसा?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.