राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परीक्षेची जबाबदारी झटकत गृह महाविद्यालयात परीक्षा घेण्याचा घेतलेला निर्णय विद्यापीठाला चांगलाच भोवला आहे. परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न, जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका, परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका फुटणे, पासवर्ड, आयडीचा वापर, यामुळे गैरप्रकारांना ऊत आला असून परीक्षेच्या गोपनियतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी, परीक्षेच्या १५ दिवसांतच नवीन सूचना जाहीर करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली आहे.

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू आहेत. ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीने गृह महाविद्यालयात परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांचे चांगलेच फावले आहे. उन्हाळी परीक्षेमध्ये दररोज नवनवे गैरप्रकार समोर येत आहेत. एका महाविद्यालयात बी.एस्सी. चौथे सत्र गणित १ विषयाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका ‘व्हॉट्सॲप’वर प्रसारित झाली होती. त्यामुळे विद्यापीठाने ही परीक्षा पुन्हा ६ जुलैला ३.३० ते ५ या वेळेत घेण्याचा निर्णय घेतला. गृह महाविद्यालय असल्याने परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मोबाईल नेण्यास अघोषित मुभा असल्याचे दिसून येते. परीक्षेतील गैरप्रकाराचे नवीन उदाहरण म्हणजे, गुरुवारी झालेल्या समाजकार्य विषयाच्या पदवी द्वितीय वर्षाच्या परीक्षेत मराठी विषयाची जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना आल्या पावली परत जावे लागले. असे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत.

पाचपावली येथील सिंधू महाविद्यालयात वीजपुरवठा खंडित झाल्याने दोन विषयांच्या प्रश्नपत्रिकांची छायांकित प्रत काढण्यास विलंब झाला, यामुळे विद्यार्थ्यांना ‘व्हॉट्सॲप’वर प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यातून उत्तरांची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आल्याने पेपर रद्द करण्यात आले. या प्रकारांमुळे विद्यापीठाने गुरुवारी परीक्षेसंदर्भात नवीन परिपत्रक काढून गैरप्रकार रोखण्यासाठी महाविद्यालयांना काही सूचना दिल्या आहेत. मात्र, विद्यापीठाकडे परीक्षेसाठी संपूर्ण यंत्रणा असतानाही गृह महाविद्यालयात परीक्षा केंद्र दिल्यामुळे गोपनियतेला धक्का बसला आहे.

प्रश्नपत्रिकांच्या ‘पासवर्ड’, ‘आयडी’चा गैरवापर –

परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून पाठवल्या जातात. या प्रश्नपत्रिका व उत्तरसूची डाऊनलोड करण्यासाठी प्राचार्य आणि केंद्रप्रमुखांना विद्यापीठाद्वारे ‘पासवर्ड’ व ‘आयडी’ देण्यात आलेला असतो. मात्र, महाविद्यालयातील लिपिक व इतर व्यक्ती पासवर्ड, आयडीचा वापर करून प्रश्नपत्रिका काढत आहेत. त्यामुळे महाविद्यालयांनी परीक्षेची गोपनियता पाळावी, अशा सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.

दरम्यान, बी.एस्सी. चौथे सत्र गणित १ विषयाची परीक्षा ६ जुलैला ३.३० ते ५ वाजता होणार आहे. परीक्षा केंद्रांमध्ये भ्रमणध्वनी, इलेट्रॉनिक गॅजेट नेऊ देऊ नका, अन्यथा कारवाई केली जाईल, अशा सूचना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने गुरुवारी परिपत्रकाद्वारे महाविद्यालयांना केल्या आहेत.