नागपूर : मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेत भाजप कार्यकर्त्यांचा अनधिकृत हस्तक्षेप होत असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. एसआयआर प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने निष्पक्षपणे राबविणे अपेक्षित असताना, या प्रक्रियेत भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग घेतला जात असल्याचा दावा त्यांनी केला. त्याबाबत त्यांनी भाजपने कार्यकर्त्यांना दिलेले ओळखपत्र देखील दाखवले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
नागपूर जिल्ह्यात २९ जूनपासून एसआयआर प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील आमदार निवास आणि रविभवन येथे सुमारे ५०० कार्यकर्ते बाहेरून येऊन वास्तव्यास असल्याचे गुडधे यांनी सांगितले. या कार्यकर्त्यांना महापालिकेच्या बसद्वारे विविध मतदारसंघांत पाठवून शासकीय बीएलओंसोबत काम करण्यास सांगितले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर ते कोणत्याही राजकीय पक्षाचे अधिकृत बीएलए नसून, बीएलओंना मदत करण्याच्या नावाखाली एसआयआर प्रक्रियेत सहभागी होत असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा गुडधे यांनी केला. एसआयआर प्रक्रियेत केवळ शासकीय बीएलओ आणि राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले अधिकृत बीएलए यांचाच सहभाग अपेक्षित आहे. मात्र, भाजपकडून ‘एसआयआर सर्वेक्षण समन्वयक’ अशा स्वरूपाची ओळखपत्रे देऊन काही कार्यकर्त्यांना प्रक्रियेत सहभागी केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री कार्यालय असलेल्या हैदराबाद हाऊसमधूनही एसआयआर प्रक्रियेसंदर्भातील कामकाज सुरू असल्याची माहिती काही कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर मिळाल्याचा दावा गुडधे यांनी केला. मुख्यमंत्री कार्यालयाचा या प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप असल्यास तो नियमबाह्य ठरेल, असे सांगत प्रशासनाने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करा
आमदार निवास, रविभवन आणि हैदराबाद हाऊस येथील मागील महिनाभरातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच एसआयआर प्रक्रियेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांतून जाहिरात करण्याची मागणी यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती, मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे गुडधे यांनी सांगितले.
भाजपविरोधी मतदारांना डावलण्याचा डाव
भाजपविरोधी मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणावर जनतेसमोर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
नागपूरची पूरस्थितीसाठी भाजप नेते जबाबदार : गुडधे
शहरातील अनियोजित विकासकामांमुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत असून, त्याला भाजप नेते जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी केला. सिमेंट रस्ते, उड्डाणपूल आणि भुयारी रेल्वे मार्गांच्या कामांचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी घेतात, मात्र या कामांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची जबाबदारीही त्यांनी स्वीकारावी, असे गुडधे म्हणाले. भाजप नेत्यांच्या इच्छेनुसार नको त्या ठिकाणी झालेल्या बांधकामांमुळे शहराच्या नैसर्गिक जलनिचरा व्यवस्थेवर परिणाम झाला असून, दरवर्षी नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
