भाकरी जर वारंवार करपत असेल तर ती थापणारी व्यक्ती कधी तवा, कधी पीठ, कधी पाणी बदलून बघेल. तरीही फरक पडत नाही हे लक्षात आल्यावर किमान थापणारा बदलवला जाईल. एकेकाळी पक्षाचा गड अशी ओळख असलेल्या उपराजधानीत काँग्रेसने यापैकी काहीही केले नाही. तब्बल बारा वर्षे. यामुळे भाजपच्या झंझावातात हा पक्ष आक्रसत गेला. सतत पराभव स्वीकारत राहिला पण थापणारा व्यक्ती म्हणजे आचारी बदलावा असे या सुस्त पक्षाला कधी वाटले नाही. आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर पक्षाने बदल स्वीकारला.

दीर्घकाळ शहराध्यक्ष असलेल्या आमदार विकास ठाकरेंना बदलून प्रफुल्ल गुडधेंकडे पक्षाची धुरा सोपवली. गुडधेंची निवड योग्यच पण यामुळे पक्षाला चांगले दिवस येतील का? ज्या चुका ठाकरेंनी केल्या त्या गुडधे सुधारतील का? या पक्षावर शहरात होत असलेला ‘भाजपची बी टीम’ हा आरोप गुडधे पुसून काढतील का? नकारात्मक भावना त्यागून ते सकारात्मक पद्धतीने भाजपला आव्हान देऊ शकतील का? याची उत्तरे येणाऱ्या काळात मिळतील. पण पक्षाची अशी अवस्था का झाली यावर यानिमित्ताने मंथन गरजेचे.

बहुजन चेहरा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपलेसे करून घेण्याची वृत्ती हे विकास ठाकरेंच्या कार्यशैलीतील महत्त्वाचे घटक. दीर्घकाळ पालिकेचे राजकारण केल्याचा हा फायदा. याच बळावर ते आमदार झाले. मात्र हे मर्यादित कर्तृत्व पक्षवाढीला पोषक ठरू शकत नाही याचे भान त्यांना या बारा वर्षात कधी आले नाही.

पक्ष वाढवायचा असेल तर समोर असलेल्या तगड्या विरोधकाला वारंवार आव्हान देत राहणे, सत्तेने केलेल्या चुका जनतेसमोर आणणे, लोकांच्या प्रश्नासाठी लढे उभारणे, केवळ भाजपच नाही तर त्यातल्या नेतृत्वाला लोकांच्या प्रश्नावरून सळो की पळो करून सोडणे हे त्यांचे काम होते. त्यात ते सपशेल अपयशी ठरले. भाजपच्या जवळचे असा आरोप त्यांच्यावर चिकटला तो यातूनच. अर्थाच स्वत: ठाकरे तो आरोप अगदी तावातावाने नाकारतात. मी माझ्या मतदारसंघात कसे यश मिळवले ते सांगतात. पण संपूर्ण शहराचे काय? ठाकरेंनी या काळात अनेक आंदोलने केली पण कुणाविरुद्ध तर कचरा गोळा करणाऱ्या कंपन्या, स्थानिक प्रशासनाविरुद्ध.

या शहरातला एकही निर्णय गडकरी व फडणवीसांच्या संमतीशिवाय होत नाही. भाजपचे राजकारण, विकासकारण व सत्ताकारण याच दोन चेहऱ्यांभोवती फिरते. अनेकदा सामान्य मतदार सुद्धा या दोघांकडे बघून पक्षाला मतदान करतात. याची पूर्ण जाणीव असूनही ठाकरेंनी या दोघांना राजकीय पातळीवर कधी लक्ष्य केल्याचे दिसले नाही. शंकेला बळ मिळते ते इथे. भलेही त्यात तथ्य नसले तरी. नागपुरात दंगल झाली तेव्हा अवघी शहर काँग्रेस शांत होती. याचे खुद्द भाजपच्या आमदाराने जाहीर कौतुक केले. शेवटी पक्षाच्या वरिष्ठांना येथे येऊन भूमिका घ्यावी लागली.

दंगलीवर भूमिका घेणे म्हणजे केवळ मुस्लिमांची बाजू उचलून धरणे नव्हे. अशी हिंसा ही दोन्ही बाजूच्या सर्वसामान्यांचे नुकसान करत असते. ही बाब शहर काँग्रेसने लक्षातच घेतली नाही. या निष्क्रियतेचा परिणाम एमआयएमच्या उदयात झाला. अगदी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पालिका निवडणुका बघा. यात निर्भेळ यश मिळवणे भाजपसाठी तसे कठीण होते. हे लक्षात येताच प्रत्येक प्रभागातील दीड हजार मतदार दुसरीकडे स्थानांतरित करण्याची खेळी खेळली गेली. मतदाराने रीतसर अर्ज भरून विनंती केल्याशिवाय असे करता येत नाही. हा नियमच पायदळी तुडवला गेला. हे लक्षात येऊनही शहर काँग्रेस शांत राहिली. का याचे उत्तर अजूनही कुणी देत नाही. शंका निर्माण होते ती इथे. अपवाद फक्त प्रफुल्ल गुडधेंचा. त्यांनी हा मुद्दा लावून धरला. दबावात असलेल्या प्रशासनाने तो फेटाळून लावला तो भाग वेगळा. याचा स्पष्ट परिणाम निकालात दिसून आला.

अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पाचशे, हजारच्या फरकाने पराभूत झाले. या शहरात काँग्रेसची विचारसरणी जोपासणारा मतदार आजही पाच ते सहा लाखाच्या घरात आहे. त्यात पाच ते सात टक्क्यांची भर घातली तरी या पक्षाला अनेक ठिकाणी विजय मिळू शकतो. गेल्या दहा वर्षातील मतदानाची आकडेवारी तपासली की हे सहज लक्षात येते. जे इतरांच्या येते ते शहर काँग्रेसच्या लक्षात का येत नाही?

पालिका निवडणुकीत भाजपला पाच लाखाच्या वर मते मिळाली तर काँग्रेसला चार लाखापेक्षा जास्त. म्हणजे फरक एक लाखाचा आणि मिळालेल्या जागांमध्ये तफावत ७० ची. या साऱ्या बाबी शहर काँग्रेसची निष्क्रियता दाखवणाऱ्या नाहीत का? आता एसआयआरची मोहीम सुरू झालेली. त्यात काँग्रेस आहे कुठे? भाजपची शिबिरे, बीएलएची पायपीट सारे काही युद्धस्तरावर सुरू. काँग्रेसचा एक तरी बीएलए एखाद्या वस्तीत दिसला का? इतकेच कशाला, प्रशासनाने आयोजित केलेल्या यासंबंधीच्या बैठकांनाही काँग्रेसचे पदाधिकारी का जात नाहीत?

सरकार कोणत्याही पक्षाचे असो. सामान्यांमध्ये त्याविषयी नाराजी असतेच. मुद्दा आहे तो ती ‘कॅश’ करून त्याची व्याप्ती वाढवत नेण्याचा. हेच काँग्रेसचे खरे काम. त्यात तो कायम मागे पडत आलेला. गुडधेंसमोरचे आव्हान असेल ते हे. भाकरी करपू न देण्याचे. यासाठी त्यांना संपूर्ण पक्षातच रुजलेली सरंजामी वृत्ती नष्ट करावी लागेल. या पक्षातले अनेक नेते आजही लढायचे, हरायचे व पक्षावर ताबा मिळवून बसायचे याच मानसिकतेचे. तीन-तीनदा पराभव होऊनही मलाच उमेदवारी हवी असा बालिश हट्ट धरणारे. या सर्वांना कठोरपणे त्यांची जागा दाखवून देण्याचे काम गुडधेंना करावे लागेल.

भाजपचे प्रचारतंत्र केवळ निवडणुकांपुरते मर्यादित नसते. या पक्षाचे लोक सतत काम करतात. शिवाय त्यांच्या मदतीला संघ व परिवारातील अनेक संघटना सदैव तैनात असतात. तेही प्रत्येक क्षेत्रात. प्रचारासाठी अशी बहुस्तरीय रचना उभारण्याची ताकद आजवर कधीच काँग्रेसने दाखवली नाही.

पराभवासाठी मतदारांना दोषी न धरता गुडधेंना या पातळीवर किमान एक पाऊल तरी पुढे टाकावे लागेल. सत्तेला सक्षम पर्याय केवळ मेहनतीतूनच उभा राहू शकतो याची जाणीव सर्वांना करून द्यावी लागेल. मुख्य म्हणजे भाजपच्या नेत्यांना थेट आव्हान द्यावे लागेल. पक्षासाठी झटण्याची तयारी असलेले अनेक नवे चेहरे या पक्षात आहेत. त्यांना सोबत घेत, समोर करून लढावे लागेल. राजकारणात केवळ बुद्धिमान राहून यश मिळवता येत नाही. बुद्धीचा चतुराईने वापर करूनच ते मिळते. यासाठी अंगी प्रचंड संयम लागतो. त्याची चुणूक गुडधेंना दाखवावी लागेल. निवडणुकीतील यशापयशाचा विचार न करता सामान्यांचा आवाज असलेला सक्षम विरोधी पक्ष त्यांना उभा करावा लागेल. बघूया आता हा नवा आचारी भाकरीचे काय करतो ते!