नागपूर : भांडेवाडीतील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्यावर २६ आॅगस्टला संघटीत गुन्हेगार टोळीने कट रचत गोळीबार केला. या टोळीतल्या ७ सदस्यांना पोलिसांनी गुजरात आणि छत्तीसगड राज्यातून जेरबंद केले. मोटघरे यांनी वाठोडा परिसरातल्या अमली पदार्थ विक्रीला विरोध केल्यामुळे फरार सुत्रधार विशाल गुप्ता उर्फ फल्ली यानेच सुपारी देऊन हा गोळीबार घडवून आणल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस तपास पोहोचला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी संघटित गुन्हेगारी कलमांतर्गत मकोका लावण्याची तयारी सुरू केली आहे.

सुपारी देऊन रचला कट….

घटनेच्या आदल्या रात्री गोळीबारातला मुख्य सुत्रधार विशाल गुप्ता उर्फ फल्ली याच्या सांगण्यावरून सर्व आरोपी २५ ऑगस्टला अशोक यादव उर्फ बाबाजी यांच्या ऑफिसमध्ये एकत्र आले होते. तिथेच अंमली पदार्थ तस्करीत सक्रीय फल्लीने गोळीबाराची सुपारी दिल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. त्यानेच नगरसेवकाला धमकावण्यासाठी कट रचल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस तपास पोहोचला आहे. मात्र गोळीबार केवळ धमकीसाठी होता की आणखी कोणत्या मोठ्या कटाचा भाग, याचा पोलीस खोलात जाऊन शोध घेत आहेत.

नेमकी घटना कशी घडली….?

२६ ऑगस्टच्या मध्यरात्री श्रावणनगर परिसरातील मोटघरे यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीच्या दिशेने दुचाकीवरून आलेल्या दोन मुखवटाधारी व्यक्तींनी गोळी झाडली होती. गोळिबारानंतर हल्लेखोर खांडवानी टाउन रोडवरील स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने पळताना दिसले. त्या आधारे माग काढण्यासाठी पोलिसांनी सात पथके नियुक्त केली होती. पोलिसांनी या प्रकरणात ५००हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने संशयितांची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात २५ हजारांहून अधिक कॉल रेकॉर्ड, टॉवर डम्प आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. सुमारे ५० हजार रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचा मागही पोलिसांना लागला.

कटाचा मास्टर माईंड अमली पदार्थ तस्कर…

अखेर गुन्हे शाखेने गोळी झाडणाऱ्यासह सात जणांना वेगवेगळ्या राज्यातून अटक केली. वाठोड्यातील अमली पदार्थांचा व्यावसायिक या कटाचा मुख्य सूत्रधार असून तो फरार आहे. या एकंदर कटात अंकुश तोमसकर (३०) याने ही गोळी झाडल्याचे तपासात समोर आले. त्याला छत्तीसगडमधील राजनांदगाव येथून पोलिसांनी अटक केली होती. गोळीबार करत असताना ऋषभ ऊर्फ छोटू नागदेवे हा दुचाकी चालवत होता. तर या गोळीबाराचा कट रचणारे अमित ठाकरे, रोमित ऊर्फ पुल्या वाहणे, ऋषभ पैठल, केतन माटे आणि कार्तिक तोमसकर यांनाही पोलिसांनी नंतर अटक केली. आरोपींकडून ८० हजार रुपये किमतीचे आठ भ्रमणध्वनी जप्त पोलिसांनी जप्त केले आहेत.