नागपूर : महापालिकेत निवडून आल्यानंतर काँग्रेस नगरसेवकांकडून विविध समस्याकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. यातून नागपूरकरांना आंदोलनाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहे. एका काँग्रेस नगरसेवकाने शुक्रवारी चक्क भर चौकात आंघोळ करून महापालिका व पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यू कंपनीचा निषेध केला.
ओसीडब्ल्यूने बसविलेल्या एका व्हॉल्व्हमधील गळतीमुळे पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. याकडे वारंवार लक्ष वेधूनही ओसीडब्ल्यूचा निष्काळजीपणा कायम असल्याचा आरोप करीत नगरसेवक गौतम अंबाडे यांनी चौकात गळतीच्या पाण्याने आंघोळ करीत आंदोलन केले. उत्तर नागपूरच्या कमाल चौक परिसरात ओसीडब्ल्यूने काही दिवसांपूर्वी जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसवला. परंतु या व्हॉल्व्हमधून गळतीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात स्वच्छ पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
दुसरीकडे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. ओसीडब्ल्यू प्रशासनाकडे अनेक तक्रारी आणि सूचना देऊनही समस्या कायम असल्याने नगरसेवक गौतम अंबाडे आणि आसीनगर झोनचे सभापती आसिफ शेख यांनी एक अनोखे आंदोलन केले. नगरसेवक गौतम अंबाडे यांनी रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यात स्नान केले आणि सभापती आसिफ शेख यांनी ओसीडब्ल्यूविरोधात निषेध नोंदवला. कमाल चौकातील गळती सुरू असलेला व्हॉल्व्ह तत्काळ दुरुस्त करावा आणि पाण्याची नासाडी रोखण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
गळती जमिनीखालील जुन्या जलवाहिनीतून
दरम्यान ओसीडब्ल्यू कंपनीने कमाल चौकातील पाण्याची गळती ही व्हॉल्व्हमधून होत नसून, रस्त्याच्या पृष्ठभागाखाली असलेल्या ३०० मिमी व्यासाच्या जुन्या वितरण पाईपलाईनमधून होत असल्याचे सांगितले. जमिनीखाली गळणारे पाणी प्रत्यक्षात व्हॉल्व्हच्या ॲक्सेस पाईपमधून बाहेर पडत आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कामे करणारी कंत्राटदार कंपनी एनसीसीने कमाल चौक आणि पाचपावली रेल्वे क्रॉसिंग दरम्यान ३०० मिमी व्यासाच्या वितरण जलवाहिनीचे अनेक ठिकाणी नुकसान केले.
सुरुवातीला, एनसीसीने या जलवाहिनीची दुरुस्ती केली. तथापि, जलवाहिनी रस्त्याच्या मध्यभागी असल्याने आणि अनेक ठिकाणी खराब झाल्यामुळे, गळती पूर्णपणे थांबवता आली नाही. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी एनसीसीने अंदाजे ४५० मीटर लांबीची नवीन समांतर ३०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे आणि जुनी जलवाहिनी बंद करण्याचे काम हाती घेतले. एकूण ४५० मीटरपैकी, अंदाजे ३८० मीटर जलवाहिनी आधीच टाकण्यात आली असून, उर्वरित ७० मीटरचे काम प्रगतीपथावर आहे. नव्याने टाकलेली जलवाहिनी विद्यमान वितरण जलवाहिनीला जोडली गेली आणि जुनी जलवाहिनी कायमची बंद केल्यानंतर गळतीची समस्या पूर्णपणे सुटेल. हे काम एप्रिल २०२६ मध्ये सुरू झाले असून, जून २०२६ च्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचे ओसीडब्ल्यूने स्पष्ट केले.
