नागपूर : डोबीनगर झोपडपट्टीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही गेलो होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रम संपवून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर थांबून त्यांनी आमचे निवेदन स्वीकारले आणि त्यानंतर झोपड्या हटविण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला, असे काँग्रेसचे नगरसेवक वसिम खान यांनी सांगितले.

भेटीबाबत मुख्यमंत्र्यांच्या माहिती देताना खान म्हणाले की, मध्य नागपुरातील डोबीनगर परिसरातील रेल्वे रुळालगतच्या सुमारे ११९ झोपड्या हटवण्यासंदर्भात दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावली होती. या नोटिशीची अंतिम मुदत ३ जून होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक वसिम खान यांनी पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्याशी संपर्क साधला.

झोपडपट्टी हटवण्याची कारवाई थांबवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान, ३० मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार ठाकरे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला.

शहरातील एका कार्यक्रमाहून परतत असताना रेशीमबाग परिसरातील रस्त्यावर थांबले. त्यावेळी त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत निवेदन स्वीकारले, असे खान यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक ८ मधील डोबीनगर झोपडपट्टी हटवण्याची प्रक्रिया रेल्वेकडून सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सुमारे ७०० कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कारवाई तातडीने थांबवून रहिवाशांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्याचेही खान यांनी सांगितले.