नागपूर: केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे देशात पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे असह्य झाले आहे. या विरोधात शुक्रवारी नागपूर शहर आणि ग्रामीण काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालया पुढे निदर्शने करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
आंदोलनादरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. वाढलेली महागाई आणि इंधन टंचाई त्वरित दूर न झाल्यास आंदोलन आणखी करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करण्यात आले, ज्यामध्ये पेट्रोल-डिझेलची दरवाढ तात्काळ मागे घेण्याची आणि महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या आंदोलनात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी एकत्र येत शक्तीप्रदर्शन केले. यामध्ये रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री व आमदार डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री अनिस अहमद, आमदार संजय मेश्राम, माजी आमदार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक धवड प्रामुख्याने उपस्थित होते.
याशिवाय अखिल भारतीय काँग्रेसचे सहसचिव नितीन कुंभलकर, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव याज्ञवल्क्य श्रीकांत जिचकार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर कन्हेरे, नागपूर ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस, नागपूर शहर काँग्रेस महिला अध्यक्षा संगीता तलमले, एनएसयूआयचे नागपूर अध्यक्ष अश्विन नवाले आणि प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संजय दुबे व संदेश सिंगलकर यांनीही आंदोलनाचे नेतृत्व केले.
सर्वसामान्यांचे जगणे कठीण: प्रफुल्ल गुडधे
यावेळी झालेल्या सभेत शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आज देशात महागाई गगनाला भिडली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने वाहतूक खर्च वाढला असून त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसत आहे. काँग्रेस पक्ष जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, न्याय मिळेपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील.
नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची मोठी फौज मैदानात
या आंदोलनात प्रदेश काँग्रेस महासचिव कुंदाताई राऊत, सचिव अवंतिकाताई लेकुरवाडे, सुरेश जग्यासी, विजय सरटकर, प्रकाश वासू, हैदर अली दोसानी, नयना झाडे यांच्यासह नागपूर महानगरपालिकेतील अनेक आजी-माजी नगरसेवकांनी सहभाग घेतला. यामध्ये नगरसेविका सुजाताताई कोंबाडे, शीला तराळे, कांचनताई चव्हाण, कुमुदिनी गुडधे आणि नगरसेवक दिनेश यादव, मनोज गावंडे, रामा उके, शुभम मोटघरे, गौतम अंबादे, सुहास नानवटकर, ॲड. शैलेंद्र डोरले, आसिफ शेख तसेच माजी नगरसेवक तनवीर अहमद, अशोक यावले, जुल्फिकार भुट्टो, अनिल मचले, शहर काँग्रेस उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे आणि ओ. एस. कादरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या या ठिय्या आंदोलनामुळे काही काळ परिसरातील वातावरण तापले होते.
