नागपूर : नागपूरमध्ये संविधानाची प्रत घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाकडे मोर्चा काढणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या पोलीस कारवाईवरून काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या कारवाईचा निषेध करत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

शिवराज मोरे गंभीर जखमी

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर नागपूर पोलिसांनी केलेली कारवाई अमानुष असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. या कारवाईत मोरे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संविधानिक मार्गाने मोर्चा काढणाऱ्या युवकांवर अशा प्रकारची कारवाई करणे संतापजनक असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे.

‘संविधानाची प्रत हातात, तरी गळा आवळला’

संविधानाची प्रत घेऊन आरएसएस मुख्यालयाकडे जात असताना हेल्मेटधारी पोलिसांनी शिवराज मोरे यांचा गळा आवळला असा दावा सपकाळ यांनी केला. संविधानाची प्रत हातात घेऊन चालणाऱ्या युवकाचा गळा दाबने म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखेच असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले. या घटनेची गंभीर दखल घेण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

फडणवीसांच्या शहरात लोकशाहीचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात त्यांच्या इशाऱ्यावर लोकशाहीचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. पोलिसांची कारवाई ही केवळ प्रशासकीय पातळीवरील बाब नसून सत्तेच्या अहंकाराचे उदाहरण असल्याची टीका त्यांनी केली. सरकारचे पोलीस जनतेचे रक्षक न राहता सत्तेच्या गुंडांची भूमिका बजावत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

‘जनता सत्तेचा माज उतरवेल’

पोलिसांच्या कारवाईवरून काँग्रेस आणि सत्ताधारी यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बळाचा वापर केल्यास त्याचा जाब सरकारला द्यावा लागेल, असा सूर काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आला आहे. ‘तुमच्या अहंकारी सत्तेचा माज जनता निश्चित उतरवेल,’ असा इशाराही सपकाळ यांनी आपल्या ट्विटद्वारे दिला आहे.